अकोला : राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ज्वारी खरेदी कमी झाल्याने त्या जिल्ह्यांचे उद्दिष्ट घटवून अकोला आणि अमरावती जिल्ह्याचे ५३ हजार ५०० क्विंटलने उद्दिष्ट वाढविण्यात आले आहे. त्यामुळे बंद केलेली ज्वारी खरेदी पुन्हा पणन महासंघाकडून सुरू करण्यात येईल. या संदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्रालयाकडून १४ जूनला अकोला, अमरावतीचे जिल्हाधिकारी व पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देण्यात आले आहे.

शासनाकडून आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२३-२४ साठी एक लाख ३६ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पणन महासंघास देण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात ज्वारी खरेदी सुरू केली. गेल्या हंगामात पेरा वाढल्याने अधिक ज्वारी खरेदीची शक्यता विचारात घेऊन खरेदीचे उद्दिष्ट सहा लाख ८४ हजार क्विंटलने वाढवून देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला. दरम्यान, अकोला अमरावती जिल्ह्यांना देण्यात आलेले ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. ज्वारी खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून असल्याने पुन्हा खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्वारी खरेदी उद्दिष्ट वाढवून देण्यासंदर्भात मागणी केली. रब्बी पणन हंगाम २०२३-२४ मध्ये मूळ एक लाख ३६ हजार क्विंटलच्या उद्दिष्टात बदल न करता त्यात बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>विस्तव कायम! खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार सोहळ्यांपासून विजय वडेट्टीवार दूरच; काँग्रेसमध्ये…

राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ज्वारीचे खरेदीचे पणन महासंघाला एक लाख ३६ हजार क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, जालना, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात ज्वारी खरेदी कमी झाल्याने त्या जिल्ह्यांचे एकूण ५३ हजार ५०० क्विंटलचे उद्दिष्ट घटविण्यात आले आहे. ते घटवलेले उद्दिष्ट अकोला आणि अमरावती जिल्ह्यात वाढविण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यात पूर्वीचे १५ हजार क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने आता नव्याने २८ हजार ५०० क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले असून आता एकूण ४३ हजार ५०० क्विंटल ज्वारी अकोला जिल्ह्यात पणन महासंघाकडून खरेदी केली जाईल. अमरावती जिल्ह्यात सुद्धा १५ हजार क्विंटल खरेदी पूर्ण झाल्याने नव्याने २५ हजार असे एकूण ४० हजार क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात येईल. अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बंद झालेली ज्वारी खरेदी पुन्हा एकदा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाढीव उद्दिष्ट देखील कमीच

कृषी विभागाच्या पीक पेऱ्यानुसार अकोला जिल्ह्यात सुमारे एक लाख २४ हजार ८७० क्विंटल ज्वारीची खरेदी अपेक्षित आहे. त्यामुळे हंगामामध्ये अकोला जिल्ह्यातील ज्वारीचे एक लाख १० हजार क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी केली होती. उद्दिष्ट वाढले, मात्र ते देखील कमीच पडण्याची शक्यता आहे.

पणन महासंघाला ज्वारी खरेदीचे वाढीव उद्दिष्ट प्राप्त झाले. लवकरच ज्वारी खरेदी केंद्र पुन्हा सुरू होणार आहे.- डॉ. प्रवीण लाेखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.