गोंदिया : ग्रामीण भागातील लोकाभिमुख प्रशासनाची एक नवी दिशा दाखवणारा महत्त्वपूर्ण निर्णय सडक-अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्रामपंचायतीने घेतला आहे. गावातील कोणत्याही कुटुंबात बालकाचा जन्म झाल्यास किंवा कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यास संबंधित कुटुंबाला ग्रामपंचायतीमार्फत चार दिवसांच्या आत ४,९०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
ऐतिहासिक निर्णय
‘जन्म-मृत्यू सहायता योजना’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाला शुक्रवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. गुरुदेव व्यायाम मंदिर परिसरात सरपंच हर्ष विनोद मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ग्रामसभेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ग्रामीण जीवनात जन्म हा आनंदाचा उत्सव तर मृत्यू हा दुःखाचा डोंगर घेऊन येतो. अशा दोन्ही प्रसंगांत कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, या सामाजिक संवेदनशीलतेतून ही योजना साकारण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले.
योजना बंद होणार नाही
योजनेनुसार लाभार्थी कुटुंबाने ग्रामपंचायतीकडे आवश्यक अर्ज सादर केल्यानंतर चार दिवसांच्या आत धनादेशाद्वारे ४,९०० रुपयांची मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम ग्रामनिधीतून वितरित केली जाणार असून या योजनेला कायम स्वरूप देण्यासाठीही ग्रामसभेने महत्त्वपूर्ण तरतूद मंजूर केली आहे. भविष्यात कोणताही सरपंच किंवा पदाधिकारी वैयक्तिक निर्णय घेऊन ही योजना बंद करू शकणार नाही.
ग्रामसभेची मंजुरी बंधनकारक
योजनेत बदल अथवा ती रद्द करण्यासाठी ग्रामसभेची मंजुरी बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, ग्रामसभेत जनगणना प्रक्रियेतील ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकान्याचा अभाव हा विषयही चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला. ग्रामीणांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
लोकसहभाग व ग्रामस्वराज्याची जाणीव
अखेर जनगणना अर्जामध्ये इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध होईपर्यंत जनगणना प्रक्रियेत सहभागी न होण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि ग्रामस्वराज्याची जाणीव यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या निर्णयामुळे सौंदड ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. ग्रामीण विकासाच्या वाटचालीत लोकाभिमुख उपक्रमांची नवी पायवाट निर्माण करणारा हा निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
