अकोला : सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होते. आरक्षण अगोदरच ‘फुल्ल’ झाले. या गर्दीची काळात रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने दक्षिण मध्य रेल्वेद्वारे साप्ताहिक विशेष गाड्या विविध रेल्वेस्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेतला.

या मार्गावर धावणार विशेष गाड्या

गाडी क्रमांक ०७६२१ हजूर साहिब नांदेड – हजरत निजामुद्दीन गाडी १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान धावणार असून या गाडीच्या सात फेऱ्या होतील. ०७६२२ हजरत निजामुद्दीन-हजूर साहिब नांदेड दररविवारी १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान धावेल. ०७६५१ जालना – छपरा विशेष गाडी दर बुधवार ७ ऑक्टोबरपासून २८ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. छपरा – जालना दर शुक्रवारी ९ ते ३० ऑक्टोबरदरम्यान धावेल. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी चार फेऱ्या होतील. ०७६०५ हजूर साहिब नांदेड – उधना दर सोमवार ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. ०७६०६ उधना – हजूर साहिब नांदेड विशेष गाडी दर मंगळवार ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरपर्यंत धावणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी आठ फेऱ्या होणार आहेत.

विविध स्थानकावर गाड्यांना थांबा

गाडी क्रमांक ०७६०५/०७६०६ हजूर साहिब नांदेड – उधना – हजूर साहिब नांदेड विशेष गाड्यांना दोन्ही दिशेने पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, शेगाव (फक्त गाडी क्रमांक ०७६०६ साठी), मलकापूर, भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार आणि व्यारा स्थानकांवर थांबा राहणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित प्रथम, द्वितीय, तृतीय, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहणार आहेत.

‘ब्लॉक’मुळे प्रवाशांना मनस्ताप

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीचा भाग म्हणून रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रमुख पायाभूत सुविधा आणि मार्ग सुधारण्याची कामे हाती घेतली आहेत. इगतपुरी – भुसावळदरम्यान कसबे सुकेने आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचना कामाशी संबंधित ‘नॉन-इंटरलॉकिंग’ काम करण्यात आले. यासाठी ३० सप्टेंबर ब्लॉक घेण्यात आला. त्याचा परिणाम प्रवासी गाड्यांवर झाला. या ब्लॉकमुळे बडनेरा-नाशिक मेमूसह इतरही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. अनेक गाड्या उशीराने धावल्या. काहींच्या मार्गात बदल करण्यात आले होते. या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक संपूर्णत: विस्कळीत झाले होते. प्रवाशांना चांगल्याच मनस्तापाचा सामना करावा लागला.