नागपूर : दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात पायाभूत सुविधा आणि ट्रॅक देखभाल कामांसाठी ३ जुलै ते १७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दर मंगळवार व शुक्रवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरमार्गे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द, अंशतः रद्द तसेच बदललेल्या मार्गाने धावणार आहेत.

सुरक्षेसाठी ट्रॅक देखभाल

दक्षिण पूर्व रेल्वेच्या चक्रधरपूर विभागातील कंसबहाल–धारुआडीही या अप आणि डाऊन मार्गावर टीआरटी मशीनच्या साहाय्याने ट्रॅक नूतनीकरण व आवश्यक पायाभूत सुविधा दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. रेल्वे संरक्षा अधिक बळकट करणे आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या मेगा ब्लॉकचा मुख्य उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कालावधीत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी ब्लॉक घेतला जाणार असल्याने अनेक गाड्यांच्या परिचालनात बदल करण्यात आले आहेत.

हैदराबाद, टाटानगर व बिलासपूर मार्गावरील गाड्या रद्द

मेगा ब्लॉकमुळे हैदराबाद–रक्सौल (१७००५/१७००६) एक्स्प्रेसच्या विविध फेऱ्या जुलै ते नोव्हेंबरदरम्यान पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे टाटानगर–नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी–टाटानगर (१८१०९/१८११०), बिलासपूर–टाटानगर (१८११४) आणि टाटानगर–बिलासपूर (१८११३) या एक्स्प्रेस गाड्याही ठराविक तारखांना धावणार नाहीत. या गाड्यांचा वापर करणाऱ्या नागपूर आणि विदर्भातील प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.

साऊथ बिहार एक्स्प्रेस अंशतः रद्द

आरा–दुर्ग साऊथ बिहार एक्स्प्रेस (१३२८८) ही गाडी काही तारखांना राऊरकेला येथेच प्रवास समाप्त करेल. त्यामुळे राऊरकेला–दुर्ग दरम्यानचा प्रवास रद्द राहील. त्याचप्रमाणे दुर्ग–आरा साऊथ बिहार एक्स्प्रेस (१३२८७) ही गाडी काही दिवशी राऊरकेला येथूनच सुटेल. परिणामी दुर्ग–राऊरकेला हा टप्पा रद्द करण्यात आला आहे. या बदलांचा परिणाम छत्तीसगड, झारखंड आणि बिहारकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे.

काही गाड्या बदललेल्या मार्गाने धावणार

योगनगरी ऋषिकेश–पुरी उत्कल एक्स्प्रेस (१८४७८) ही गाडी निवडक तारखांना ईब–झारसुगुडा रोड–संबलपूर सिटी–कटक या पर्यायी मार्गाने पुरीकडे धावेल. तसेच आरा–दुर्ग साऊथ बिहार एक्स्प्रेस (१३२८८) काही दिवशी कांड्रा–सीनी मार्गाने धावणार असून टाटानगर आणि गम्हारिया स्थानकांना वगळण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी आरक्षणाची स्थिती, गाडीचे वेळापत्रक आणि मार्गातील बदल यांची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे.