नागपूर : बहुतांश प्रभागांत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत असली तरी मतविभाजनाचा फायदा मागील काही निवडणुकांत भाजपला होत आला आहे. कुणबी व तेली समाज बहुल असलेल्या दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील सर्वच प्रभागांत यंदा मतांचे ध्रुवीकरण होण्याची दाट शक्यता दिसत आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या प्रमुख पक्षांना त्यांची पारंपरिक मते टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे एकूण आठ प्रभाग असून क्रमांक १७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३ आणि ३४ या प्रभागांतून २५ नगरसेवक निवडले जातात. यापैकी प्रभाग क्रमांक ३०, ३१ आणि ३२ हे पूर्णतः दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात येतात.
प्रभाग क्रमांक १७ मध्ये गणेशपेठ, शनिवारी, गुजरवाडी आणि अजनी पोलीस ठाणे परिसराचा समावेश आहे. येथे काँग्रेसकडून सुजाता कोंबाडे, भाजपकडून श्रद्धा चुटेले, बसपकडून प्रियंका गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून सत्यभामा लोखंडे निवडणूक रिंगणात आहेत. आंबेडकरी मतांचे विभाजन झाल्यास भाजपला लाभ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याच प्रभागात भाजपचे प्रमोद चिखले आणि पक्षाचे बंडखोर विनायक डेहनकर यांच्यातील संघर्षाचा फायदा काँग्रेसचे सुहास नानवटकर यांना होऊ शकतो. काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांमध्येही येथे थेट लढत असून गुड्डू तिवारी काँग्रेसकडून, तर मनोज साबळे भाजपकडून मैदानात आहेत. साबळे यांच्याविरोधात मतदारांचा रोष व्यक्त झाल्याची चित्रफीत प्रसारित झाल्याने भाजपची धाकधूक वाढली आहे.
प्रभाग क्रमांक २८ मध्ये रमना मारुतीनगर, हरपूर, चिटणीसनगर, डायमंडनगर आणि दिघोरी परिसराचा समावेश आहे. भाजपचे माजी नगरसेवक विजय झलके यांच्याविरुद्ध काँग्रेसचे राहुल अभंग लढत देत आहेत. ठाकरे गटाच्या माजी नगरसेवक मंगला गवरे यांना भाजपच्या नंदा येवले यांचे आव्हान आहे. याच प्रभागात अनेक त्रिकोणी व चौरंगी लढती रंगल्या असून बंडखोरीमुळे समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग क्रमांक २९ मध्ये म्हाळगीनगर, नरसाळा आणि बेस पॉवर स्टेशन परिसर येतो. येथे काँग्रेसच्या विश्रांती भोयर यांच्याविरुद्ध लिली हातिपेठे मैदानात आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये बिडीपेठ, दत्तात्रेयनगर, छोटा ताजबाग आणि संतोषीनगरचा समावेश असून काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय महाकाळकर यांच्यासमोर भाजपचे चंदन आगरे आव्हान उभे करत आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मध्ये रेशीमबाग व आसपासचा भाग येतो. येथे काँग्रेसचे सतीश होले पुन्हा निवडणूक लढवत असून भाजपचे चंद्रकांत खंगार त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. काँग्रेसचे बंडखोर विजय बाभरे आणि पूजा मानमोडे यांच्या जनशक्ती परिवर्तन पॅनलमुळे मतविभाजनाची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक ३२ मध्ये बजरंगनगर व नवीन वसाहतींचा समावेश असून अजित पवार गट, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होत आहे.
प्रभाग क्रमांक ३३ आणि ३४ मध्येही बसप, काँग्रेस, भाजप आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीच्या लढती होत आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली असली, तरी महापालिका निवडणुकीत भाजपची संख्याबळाची बाजू मजबूत राहिली आहे. मुस्लीम आणि आंबेडकरी मते मोठ्या प्रमाणात असली, तरी त्यांच्या विभाजनाचा लाभ पुन्हा भाजपलाच होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
