लोकसत्ता टीम

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण राज्यात निवडणुकीचे वातावरण बघायला मिळत आहे. एकीकडे राजकीय पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त आहे तर दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहे.

याशिवाय काही सुजाण नागरिकही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देत आहे. नागपूरच्या अशाच एका ८० वर्षीय सुजाण ज्येष्ठ नागरिक यांनी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

आणखी वाचा-योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”

अशी राहील मोफत सेवा

नागपूरचे रहिवासी प्रकाश रंगारी यांनी दिव्यांग मतदारांसाठी दोनप्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. साधारणत: दिव्यांग मतदारांना कारसारख्या चारचाकी वाहनातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येते. मात्र असे अनेक दिव्यांग मतदार असतात ज्यांना कारमध्ये प्रवास करताना अडचण येते, अशा दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर सहायक कार उपलब्ध करून देण्याची घोषणा रंगारी यांनी केली आहे. सध्या प्रकाश रंगारी यांच्याकडे दोन दिव्यांग फ्रेंडली कार उपलब्ध आहेत. निवडणुकीच्या दिवशी या दोन वाहनासह त्यांच्या मित्रमंडळीकडे असणाऱ्या इतर चार दिव्यांग फ्रेंडली वाहनांचा वापर केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दुसरीकडे, असे अनेक मतदार आहेत जे पहिल्या किंवा त्याच्यावरील माळ्यावर राहतात. अशा दिव्यांग मतदारांना खाली उतरविण्यासाठी जिन्यावर लागणारी व्हीलचेअर देखील ते उपलब्ध करून देणार आहे. शहरातील सहाही मतदारसंघात ही सेवा मोफत उपलब्ध राहणार आहे.

आणखी वाचा-डासांपासून त्रस्त झाले का? हे करून बघा, काय सांगते पिवळ्या दिव्याचे नवे संशोधन

सेवेचा लाभ घेण्यासाठी संपर्क क्रमांक

या दोन्ही सेवेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी संपर्क करण्याचे आवाहन प्रकाश रंगारी यांनी केले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना आपले नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार यासह संपूर्ण पत्ता आणि लोकेशन पाठवायचा आहे. यासाठी ९१६७२०८५७० या व्हाट्सॲप क्रमांकावर संपूर्ण माहिती पाठवायची आहे. मर्यादित संसाधनांमध्ये अधिकाधिक दिव्यांग मतदारांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी निवडणुकीच्या दोन दिवसांपूर्वी नाव नोंदविण्याची विनंती प्रकाश रंगारी यांनी केली आहे. उल्लेखनीय आहे की लोकसभा निवडणुकीच्या वेळीही रंगारी यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. मतदानाचा हक्क हा मौल्यवान आहे आणि यापासून कुणीही वंचित राहू नये या हेतूने कार्य करत असल्याचे रंगारी यांनी सांगितले.

Story img Loader