नागपूर : न्यायालयीन पेशीवर आलेल्या एका कैद्याला नागपूर पोलिसांच्या वाहनात बसून चहा-कॉफी, नाश्ता आणि मोबाईल फोनची सुविधा देण्यात येत होती. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत सुरू होता. कैद्यांना ‘विशेष’ सुविधा देण्याचा हा प्रकार बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयाजवळ उघडकीस आला आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना मोबाईल, गांजा आणि दारूसह अन्य सुविधा मिळतात, हे सर्वश्रूत होते. मात्र, आता नागपूर पोलिसांच्या मदतीने आरोपी न्यायालयात पेशीवर आल्यानंतर ‘विशेष’ सुविधा मिळवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा : ‘बीएसएनएल’ देशभरात सुरू करणार ‘४जी’ सेवा

एका कुख्यात आरोपीला पोलिसांनी न्यायालयात आणले होते. न्यायालयासमोर पोलीस वाहन उभे करण्यात आले. पोलीस वाहनात बसलेल्या आरोपीला त्याचा साथीदार बाहेरून चहा आणि थंड पाण्याची बाटली घेऊन आला. पोलिसांच्या वाहनात बसला. आरोपीच्या हाती मोबाईल दिला. आरोपी कानाला फोन लावून बराच वेळ बोलत होता. हा सर्व प्रकार पोलिसांच्या देखरेखीत सुरू होता. या प्रकार एका युवकाने मोबाईलमध्ये कैद केला. या प्रकरणाची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली असून याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कुणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आयुक्तांनी प्रसारमाध्यमांना दिली.