जागतिक महिला दिनी एसटी महामंडळाचा निर्णय
महेश बोकडे
एसटी महामंडळाने बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवसांची रजा मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. जागतिक महिला दिनी (८ मार्च २०२३) हे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक, कार्यकारी अभियंता कार्यालयात पोहोचले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना जणू महिला दिनाचे बक्षीस देण्यात आले आहे.
रजेसाठी काही अटीही आहेत. त्यानुसार दत्तक घेण्याच्या दिनांकास दत्तक मुलाचे वय १ वर्षांच्या आत असेल तर १८० दिवस रजा लागू होईल. परंतु, हे मूल १ ते ३ वर्षे वयाचे असल्यास बाळ दत्तक घेण्याच्या दिनांकापासून ९० दिवस रजा लागू राहील. या रजेचा लाभ दत्तक संस्थेकडून मूल दत्तक घेतल्यास दत्तकग्रहण-पूर्व पोषण देखरेख टप्प्यापासून लागू होईल. इतर प्रकरणी कायदेशीर दत्तक प्रक्रियेनंतर लागू होईल. इतरही बरेच नियम आदेशात असून त्यानुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यांना लाभ दिला जाणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, हा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. या वृत्ताला एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) अजित गायकवाड यांनीही दुजोरा दिला. या रजेमुळे महिलांना त्यांच्या मुलांसाठी वेळ देता येणार असल्याचेही ते म्हणाले.
अटी-शर्ती काय?
दोनपेक्षा कमी अपत्य हयात असलेल्या महिलांना ही विशेष रजा घेतल्यावर नंतर प्रसूती रजा/ दत्तक मुलासाठी तसेच ‘सरोगसी’साठी विशेष रजा मिळणार नाही. विशेष रजेसाठी सेवा कालावधीची अट नाही. परंतु, दोन वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना रजेसाठी अर्ज करताना कार्यालयास बंधपत्र द्यावे लागेल. या बंधपत्रात महिला पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्यावर किंवा या रजेला लागून देय व अनुज्ञेय रजा घेतल्यानंतर कर्तव्यावर रुजू झाल्यावर त्यांनी राज्य शासनाची कमीत कमी दोन वर्षे सेवा करणे बंधनकारक राहणार असल्याचेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
