अमरावती : शहरालगत चांदुर रेल्वे मार्गावर वैष्णोदेवी मंदिरासमोर ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक मुलीसह तिच्या शेजारी बसलेले वडील जागीच ठार झाले, तर मागे बसलेली आई गंभीर जखमी झाली. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
साहेबराव खरबडे आणि रेणू खडबडे (रा. शेगाव नाका, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत.
साहेबराव खरबडे हे पत्नी विजया आणि मुलगी रेणू यांच्यासह वर्धा येथून अमरावतीला येत असताना शहरालगत वैष्णोदेवी मंदिराजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकचा समोरील टायर फुटला आणि भरधाव वेगात असणारा हा ट्रक कारवर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरच्या भागाचा संपूर्ण चुराडा झाला. रेणू खरबडे या कार चालवत होत्या तर त्यांच्या शेजारी त्यांचे वडील साहेबराव खरबडे बसले होते. साहेबराव खरवडे हे घटनास्थळीच ठार झाले. तर रेणू खरबडे यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या अपघातात गंभीर जखमी असणाऱ्या विजया खरबडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ट्रक चालक देखील गंभीर जखमी आहे.




अपघातानंतर नागरिकांची गर्दी घटनास्थळावर उसळली. तसेच या मार्गावरील वाहतूक बराच वेळ पर्यंत खोळंबली. अपघात होताच लगतच्या हॉटेलमधील कर्मचारी धावून आलेत आणि त्यांनी कारमध्ये अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढले. फ्रेझरपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी घटनास्थळीवरील गर्दी पांगवली.