नागपूर : देशभरात वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असताना या सप्ताहाच्या पूर्वसंध्येला समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनाने बिबट्याचा बळी घेतला. या महामार्गावर आतापर्यंत निलगाय, काळवीट, हरीण, रानडुक्कर, माकड आदी प्राण्यांचे बळी गेले होते. मात्र, आता वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अनुसूची एकमधील बिबट्याचा बळी गेल्याने या महामार्गावरील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. हेही वाचा >>> नांदुरा अपघातातील मृतांची संख्या ५, झारखंडमधील मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू समृद्धी महामार्गावर जिथे माणसांचेच बळी जात आहे, तिथे वन्यप्राण्यांच्या सुरक्षेविषयी काय सांगणार. हा महामार्ग तयार होतानाच आजूबाजूच्या वन्यप्राण्यांच्या अधिवास असलेल्या जंगलातून तो जात असल्याने त्याचवेळी त्यांच्या सुरक्षेविषयी वन्यजीवप्रेमींनी शंका व्यक्त केली होती. त्यानंतर या महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘मेटिगेशन मेजर्स’ घेण्यात येतील अशी ग्वाही शासनाकडून देण्यात आली. प्रत्यक्षात हे ‘मेटिगेशन मेजर्स’ ज्या पद्धतीने असायला हवे, त्या पद्धतीने घेण्यात आले नाहीत. त्यामुळे महामार्ग सुरु होण्याआधीच येथे वन्यप्राण्यांचा वावर आढळून आला. महामार्ग सुरू झाल्यानंतर तब्बल १४ रानडुक्कर एकाचवेळी मारली गेली. तर त्यानंतर माकड, हरीण अशा लहानमोठ्या प्राण्यांचे बळी या मार्गावर जात गेले. आता इगतपूरीजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वाहनाने बिबट्याचा बळी घेतला. या महामार्गावर माणसांच्या मृत्यूची नोंद घेतली जात आहे, पण वन्यप्राण्यांच्या मृत्यूची दखलही घेतली जात नाही.