scorecardresearch

अकोला: संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव, ‘या’ उपाययोजना करा…

संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहणीत निदर्शनात आले आहे.

orange orchards
संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव

संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहणीत निदर्शनात आले आहे. या किडीमुळे फळांवर विकृती येत असून रोग देखील वाढत आहे. त्याचा परिणाम फळांच्या दर्जावर होतो. यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन फळे प्रकल्पाकडून उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत
.
हेही वाचा >>>महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका

संत्री आंबिया बहाराची फळे ही विकसनशील अवस्थेत आहेत, तर काही भागातील मृग बहार पूर्ण विकसित अवस्थेत आहे. प्रक्षेत्र पाहणी करताना काही भागात कोळी किडीचा प्रादुर्भाव संत्री फळांवर आढळून आला आहे. कोळी किडीमुळे फळांवर विकृती येत असल्याने तसेच जखमामधून जीवाणूचा शिरकाव होत असल्याने आंबिया बहार फळांमध्ये ‘फूटलेट ब्लाईट’ रोग वाढत आहे. कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने लहान असल्या कारणाने सहजपणे दिसत नाही. कोळी कीड पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा फळांच्या सालीवर बारीक खळग्यात अंडी घालते, कोरड्या शुष्क वातावरणात यांची संख्या वाढून प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. कोळी कीड पाने व फळांचा पृष्ठभाग खरवडतात, त्यातून येणारा रस शोषतात. परिणामी, पानावर चट्टे पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास चट्ट्याचा भाग वाळतो. खरचटलेल्या जागी पेशींची वाढ खुंटते. फळाची साल खडबडीत व टणक दिसते. तपकिरी करड्या लाल किंवा जांभळट रंगाचे चट्टे पडतात. पानांवर राख किंवा धूळ साचल्यासारखे दिसते.

हेही वाचा >>>बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या

प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना कराव्यात, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.फळावर काळे डाग देखील दिसून येत आहे. त्याला ‘फूटलेट ब्लाइट’ असे संबोधले जाते. कोळी कीड किंवा फुलकिडे यांच्या प्रादुर्भावामुळे फळांना जखमा होतात. त्या जखमांधून ‘पॅन्टोआ ॲनानाटिस’ या जिवाणूचे संक्रमण होऊन फळांवर काळे डाग पडतात. प्रभावित लहान फळांवरील आवरणावर खोलगट अनियमित आकाराचे गडद काळे किंवा तपकिरी डाग पडतात. ते डाग तेलकट भासतात.

छोट्या काळ्या डागापासून सुरुवात होऊन नंतर संपूर्ण फळ काळे पडते. परिणामी बरेचदा फळे खाली पडतात. काळे डाग पडून होणाऱ्या लहान फळांची गळ कमी करण्यासाठी ‘कॉपर ऑक्सीक्लोराइड’ ५० टक्के, डब्लुपी २५ ग्रॅम १० लिटर पाणी या मिश्रणाची फवारणी करावी, अशी उपाययोजना अखिल भारतीय समन्वयीत संशोधन फळे प्रकल्पाकडून सूचविण्यात आली आहे.

प्रत खालावते
संत्री फळबागांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव झाल्यावर विकृती होऊन जीवाणूचा शिरकाव होतो. परिणामी रोगाची लागण होऊन फळांची प्रत खालावते. त्यामुळे फळांना बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 12:27 IST

संबंधित बातम्या