बुलढाणा : पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादावरून खामगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आज पुकारण्यात आलेल्या खामगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर २ वाजेपर्यंतच बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दैनंदिन व्यवहार आणि व्यापारी प्रतिष्ठाने अर्धा दिवस बंद होती. २ वाजतानंतर व्यवहार पूर्ववत सुरू झाले.

जिल्ह्यातील उद्योग व व्यापार नगरी असलेल्या खामगावमधील बहुतेक परिसरातील लहान मोठी दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने २ वाजेपर्यंत बंद होती. भाजपसह इतर संघटना आणि मंडळे यांनी पुकारलेल्या बंदला नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. दरम्यान, आज सकाळी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली.

हेही वाचा : अमरावती : नितीन गडकरींनी रस्ते चांगले केले, ते आता त्यांच्याही मागे लागले… ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

यापूर्वी रविवारी ( दि. २८ ऑगस्ट) संध्याकाळी उशिरा खामगाव विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बंदचे आवाहन करण्यात आले. पोळ्यातील काही टवाळखोरांच्या हुल्लडबाजीला जातीय दंगलीचे स्वरूप देऊन पोलीस मनमानी कारवाई व दडपशाही करीत असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष आ. फुंडकर यांनी केला होता. अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले होते.