scorecardresearch

बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले; श्रीपाल सबनीसांचं स्पष्ट मत

बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले, असं मत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं.

बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहासाचा अभ्यास मला आदरणीय आहे. त्यांनी शिवाजी महाराज घरादारात पोहचवले, हेही मला मान्य आहे, पण त्यांच्या इतिहासातील शिवाजी ब्राह्मणांकडे झुकलेला आहे. तर ब्राह्मणेत्तर शरद पाटलांनी देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग केला असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांच्या इतिहासावरुन सुरु असलेला वाद आणि त्यांच्या ‘छत्रपती शिवराय : ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद आणि विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला.

छत्रपती शिवाजी महाराजांना जातीत विभागणाऱ्या ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित इतिहासकारांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. छत्रपती शिवरायांबद्दल विकृत इतिहास लिहिण्याचा प्रघात निंदनीय असून त्या सर्वांचा इतिहास विवेकवादाने खोडल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. “ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादाजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही,” असं यावेळी ते म्हणाले.

“तर दुसरीकडे ब्राह्मणेत्तर विद्वानांनी महाराजांचे शत्रू ब्राह्मण असल्याचा भास निर्माण करताना कृष्णाजी कुळकर्णी यांना महाराजांनी ठार केल्याचे उदाहरण दिले, पण कृष्णाजी कुळकर्णी यांनाही स्वराज्याचे शत्रू म्हणून महाराजांनी मारले हे ब्राह्मणेत्तर विद्वानांना ठाऊक नाही का?,” असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“महाराज हे हिंदुत्त्ववादी म्हणवण्याचा जसा घाट घातला जात आहे, तसंच फुले, शाहू, आंबेडकरवादी असल्याचे सांगून त्यांची विभागणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून महाराजांच्या कर्तृत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर व दलित समाजातील काही विद्वानांकडून केला जात आहे. या जातीयवादी विद्वानांच्या कैदेतून महाराजांची सुटका व्हावी,” असे सबनीस म्हणाले. महाराजांच्या नावावर सुरू असलेल्या धार्मिक, राजकीय दुकानदारींवर त्यांनी प्रहार केले.

हेही वाचा : “मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही असं ते म्हणाले, मी सांगू इच्छितो की…”; शरद पवारांचं राज ठाकरेंना उत्तर

“बाबासाहेब पुरंदरे यांचा इतिहासाचा अभ्यास मला आदरणीय आहे. त्यांनी शिवाजी महाराज घरादारात पोहचवले, हेही मला मान्य आहे, पण त्यांच्या इतिहासातील शिवाजी ब्राह्मणांकडे झुकलेला आहे. तर ब्राह्मणेत्तर शरद पाटलांनी देखील शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विनयभंग केला,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sripal sabnis on dr babasaheb purandare chhatrapati shivaji maharaj in nagpur sgy

ताज्या बातम्या