नागपूर : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील (एसआरपीएफ) ‘सशस्त्र पोलीस शिपाई भरती गट : ५’साठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. यामध्ये प्रशासनाने प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातील प्रश्नसंचातून १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे उचलल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून झाली होती. लोकसत्ताने सर्वात आधी या विषयाला वाचा फोडली होती. याप्रकरणी आता सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या गरीब आणि होतकरू मुलांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा विरजण पडले. एसआरपीएफ गट ५ दौंड येथे नुकतीच शिपायांच्या १०४ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. यासाठीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे कुठल्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नव्हते. ही संपूर्ण प्रश्नपत्रिका एका खासगी प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील होती. जवळपास ८५ टक्के प्रश्न हे या पुस्तकातून उचलल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कारवाईची मागणी
अधिकाऱ्यांनी स्वतः प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी एका खासगी प्रकाशनाच्या प्रश्नसंचातून १०० पैकी तब्बल ८५ प्रश्न जसेच्या तसे उचलले आहेत. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर प्रशासकीय अपयशाचा मोठा पुरावा आहे, असा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे. १०० प्रश्नांसाठी हा पेपर घेण्यात आला असून प्रश्नपत्रिका विभागाकडून तयार होणे अपेक्षित होते. यामुळे ही परीक्षा पुन्हा घ्यावी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पोलीस महासंचालकानी काय निर्णय घेतला
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांचे अधिपत्याखालील सन २०२४-२५ सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा दिनांक ०२.०५.२०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ५, दौंड यांनी घेतलेल्या लेखी परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत १०० पैकी ८५ प्रश्न हे महाराष्ट्र पब्लीकेशन पोलीस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच १० यामधील असल्याबाबतच्या तक्रारी माध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल, म.रा., पुणे यांच्यामार्फत दिनांक ०४/०५/२०२६ पासून याप्रकरणी सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ५, दौंड यांची भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. सदर चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य कार्यवाही करण्यांत येईल, असे आदेश अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई यांनी दिले आहे.
