गडचिरोली : राज्य राखीव पोलीस बल भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान धावताना अचानक कोसळल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी विसोरा (ता. देसाईगंज) येथे घडली. आशिष भास्कर म्हशाखेत्री (रा. देलोडा बुज, ता. आरमोरी) असे मृत उमेदवाराचे नाव असून, या घटनेमुळे म्हशाखेत्री कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
नेमकी घटना काय?
भारत राखीव बटालियन-४ अंतर्गत राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १७, चंद्रपूर येथील सशस्त्र पोलीस शिपायांच्या २४४ रिक्त पदांसाठी सध्या विसोरा येथील कवायत मैदानावर भरती सुरू आहे. ३१ मार्चपासून सुरू झालेली ही प्रक्रिया १० एप्रिलपर्यंत चालणार आहे. सोमवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आशिष धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. धावपट्टीची सीमारेषा ओलांडण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना तो अचानक जमिनीवर कोसळला.
मैदानावर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना अवघ्या १० ते १५ मिनिटांत त्याची प्राणज्योत मालवली. तो शुद्धीवर असताना नेमके काय होत आहे, हे सांगण्याच्या स्थितीत नसल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
भरती प्रक्रियेतील ताण
उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी प्रशासनाने शारीरिक चाचणीची वेळ पहाटे ४ ते सकाळी ९ अशी निश्चित केली आहे. या चाचणीसाठी दररोज सुमारे एक हजार उमेदवार उपस्थित राहत असून, पहाटे २ वाजेपासूनच मैदानाबाहेर युवकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. रात्रीपासूनच हजारो तरुण मैदानावर दाखल होत असल्याने परिसरात मोठी गर्दी होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडत असली, तरी शारीरिक ओढाताण उमेदवारांच्या जीवावर बेतत असल्याचे या घटनेने समोर आले आहे. देसाईगंज पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. आरमोरी तालुक्यातील देलोडा येथील रहिवासी असलेल्या आशिषच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
