नागपूर : एसटीच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’मध्ये १०० रुपये भरले, तर प्रत्यक्षात ९८ रुपये ९४ पैसेच जमा होत असल्याचा दावा ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केला आहे. उर्वरित रक्कम नेमकी कशासाठी कापली जाते? कार्डमधून व्यवहार झाल्यानंतर छापील पावती का मिळत नाही? आणि राज्यातील सर्व सवलतधारकांना कार्ड मिळण्यापूर्वीच त्याची सक्ती कशासाठी? असे प्रश्न उपस्थित करत ज्येष्ठ नागरिक संघटनांनी एसटी महामंडळाच्या नव्या व्यवस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एनसीएमसी कार्डाचा वाद नेमका काय?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ सप्टेंबरपासून सवलतधारक प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य केल्याचे ज्येष्ठ नागरिक संघटनांचे म्हणणे आहे. मात्र, कार्ड मिळविण्यापासून त्याचा वापर आणि रिचार्जपर्यंत अनेक अडचणी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कार्ड व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत आधार कार्डच्या आधारे पूर्वीप्रमाणे सवलत सुरू ठेवण्याची मागणी पुढे आली आहे.
१०० रुपये भरल्यानंतर ९८.९४ रुपयेच जमा होतात?
संघटनांनी उपस्थित केलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा रिचार्जमधील कपातीचा आहे. प्रवाशाने १०० रुपयांचा रिचार्ज केल्यास कार्डमध्ये केवळ ९८ रुपये ९४ पैसे जमा होत असल्याचा त्यांचा दावा आहे. म्हणजे प्रत्येक १०० रुपयांमागे १ रुपया ६ पैसे कमी जमा होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही कपात नेमकी कोणत्या शुल्कापोटी केली जाते आणि सवलतधारक प्रवाशांवर त्याचा भार का टाकला जात आहे, याचे स्पष्टीकरण महामंडळाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यवहाराची छापील पावती मिळत नाही?
ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या म्हणण्यानुसार, बसमध्ये कार्डचा वापर केल्यानंतर किंवा रिचार्ज केल्यानंतर वाहकाकडील यंत्रातून प्रत्येक व्यवहाराची छापील पावती मिळत नाही. त्यामुळे कार्डमधून नेमकी किती रक्कम वजा झाली आणि किती शिल्लक राहिली, याची अधिकृत नोंद प्रवाशाच्या हातात राहत नसल्याचा आक्षेप आहे. विशेषतः डिजिटल व्यवहारांची सवय नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बाब अडचणीची ठरत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
सर्वांनाच कार्ड मिळाले आहे का?
संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार, राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना अद्याप कार्ड मिळालेले नाही. काही ठिकाणी बायोमेट्रिक प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळेही कार्ड मिळण्यास विलंब होत आहे. अशा परिस्थितीत कार्ड नसल्यामुळे पात्र प्रवाशाला एसटी प्रवासातील सवलतीपासून वंचित राहावे लागणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांची नेमकी मागणी काय?
एनसीएमसी कार्डचे वितरण सुरळीत होईपर्यंत आणि तांत्रिक त्रुटी दूर होईपर्यंत आधार कार्ड दाखवून पूर्वीप्रमाणे प्रवास सवलत द्यावी, अशी प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर रिचार्जमधील कपात थांबवून भरलेल्या रकमेचे पूर्ण मूल्य कार्डमध्ये जमा करावे आणि प्रत्येक आर्थिक व्यवहाराची छापील पावती प्रवाशाला द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास पुढे काय?
लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर, कॅप्टन प्रभाकर विंचुरकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, पूर्व विदर्भ ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सुधीर भगत यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रश्नावर भूमिका घेतली आहे. एसटी महामंडळाने अडचणी दूर करून मागण्यांची दखल घेतली नाही, तर ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
