भंडारा: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटीने महिला प्रवाशांसह अन्य प्रवाशांना नियोजित ठिकाणी न पोहोचविता रस्त्यातच सोडून माघारी परतल्याचा प्रकार उजेडात आला आहे. लाडक्या बहिणींसोबत घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त असून दोषी चालक-वाहकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील बोथली या गावातील महिला प्रवासी वैष्णवी आतिलकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. वैष्णवी आतिलकर या भंडारा आगारातून टेकेपार (वेलतूर) या गावी जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करीत होत्या. दरम्यान, त्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती बस जवाहरनगर पेट्रोलपंप येथे बंद पडली. बसचालक आणि वाहकांनी प्रवाशांसाठी दुसरी बस बोलावून घेतली. त्यानंतर सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून बस पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. परंतु, ती बस टेकेपार (वेलतूर) येथे न नेता चालकाने ती बस मांढळ या गावी थांबविली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर सर्व प्रवाशांना तिथेच उतरवून ती बस भंडाराकडे वळविली. महिला प्रवाशांनी याबाबत चालकाला विचारणा केली असता त्यांनी अरेरावी केली. ‘आम्हाला वरुन आदेश आहेत. गाडी मांढळपर्यंतच न्या’ असे चालक आणि वाहक बोलू लागले. सर्व प्रवाशांनी आपआपल्या स्थळी जाण्यासाठी तिकीट काढले असताना त्यांना अर्ध्यातच का सोडता, असे विचारले असता ‘तुम्ही दुसरी गाडी आली की तिथे बसा’, असे सांगत चालक आणि वाहकांनी बस भंडाराकडे वळविली. या प्रकारानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.