scorecardresearch

५२ टक्के एसटी बस वाहतूक खासगी बळावर

सोमवारी जिल्ह्यात दिवसभरात निघालेल्या ७७ एसटी बसेसपैकी ४० बसेस (५२ टक्के) या खासगी एजंसीकडून घेतलेल्या चालकांच्या भरवशावर निघाल्या.

नागपूर जिल्ह्यातील स्थिती  

नागपूर : कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची वाहतूक अद्याप विस्कळीत आहे. सोमवारी जिल्ह्यात दिवसभरात निघालेल्या ७७ एसटी बसेसपैकी ४० बसेस (५२ टक्के) या खासगी एजंसीकडून घेतलेल्या चालकांच्या भरवशावर निघाल्या. त्यामुळे संपकर्त्यांना सेवेवर आणण्यात महामंडळाला यश मिळणार कधी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  दिवसभरात नागपूरच्या गणेशपेठ आगारातून २९, इमामवाडा आगारातून ७, घाटरोड आगारातून २३, उमरेड आगारातून ३, सावनेर आगारातून ५, वर्धमाननगर आगारातून ३, सावनेर आगारातून ५, वर्धमाननगर आगारातून ७, रामटेक आगारातून ३ अशा एकूण ७७ बसेस निघाल्या.

त्यांनी वेगवेगळय़ा २० हजार ५४१ किलोमिटर मार्गावर ६ हजार २४३ प्रवाशांची वाहतूक केली. त्यातून महामंडळाला ७ लाख ४४८ रुपयांचा महसूल मिळाला. या सर्व बसेसमध्ये ५३.२८ टक्के प्रवासी भारमान नोंदवण्यात आले. तर दिवसभरात विभागात संपावरील एका कर्मचाऱ्यांनी पुन्हा सेवा सुरू केली. त्यामुळे २१ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंत संपावरील सेवेवर परतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता १२८ वर पोहचली आहे.

१४ कर्मचारी बडतर्फ 

एसटीचे सोमवारी वारंवार आवाहन करूनही सेवेवर न परतलेल्या १४ निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यात उमरेड आगारातील ४ चालक, ४ वाहक, २ यांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील आजपर्यंतच्या बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या १८९ वर पोहचली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: St bus transport private power ysh

ताज्या बातम्या