कामगार संघटनांना वार्षिक शुल्क न देण्याचे आवाहन

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील  काही आगारांमध्ये कामगारांकडून स्वयंस्फूर्तीने पावतीमुक्त आगार अभियान चालवले जात आहे. या अभियानानुसार, एकाही कामगार संघटनेला कामगारांनी वार्षिक शुल्क देऊ नये असे आवाहन केले जात आहे. एसटीत कार्यरत कामगारांचा संघटनांवरील विश्वास कमी होत असल्याचे हे संकेत समजले जात आहे.

एसटी महामंडळात महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना ही एकच मान्यताप्राप्त संघटना आहे.  याखेरीज इतर २३ संघटना आहेत. या संघटनांकडून कामगारांच्या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलने केली जातात. परंतु, बऱ्याचदा कामगार नेते  नमते घेत क्षुल्लक आश्वासनांवरही आंदोलन परत घेतात. याच मुद्यावर  कामगार  संघटनांवर नाराज आहेत. या कामगारांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ५०  संघर्ष ग्रुप तयार केले आहेत. त्यात  २० हजाराच्या जवळपास कामगार आहेत. यातूनच एसटीच्या सुमारे  २० आगार वा कार्यालयात पावतीमुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानानुसार एकाही कामगार संघटनेला वार्षिक वा आजीवन सदस्य शुल्क देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्याबाबत फलकही लावण्यात आले आहेत. काही भागात त्याला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे  कामगारांचा विश्वास परत मिळवण्याचे आव्हाना संघटनांसमोर आहे.

आगारांमध्ये फलक…

मुंबई सेंट्रल डेपो कार्यशाळा, परभणी विभागातील काही आगार, नांदेड विभागीय कार्यशाळा, लातूरमधील उदगीर आगारासह राज्यातील इतरही बऱ्याच आगार वा कार्यशाळेत पावतीमुक्त अभियानाचे फलक लागले आहेत.

सगळ्याच संघटना कामगारांच्या न्यायासाठी लढत असतात. त्यामुळे कामगारांनी  संघटनेविरोधात आंदोलन करणे योग्य नाही. उलट सर्व कामगार व संघटनांनी सोबत येऊन  एसटी कामगारांच्या न्यायासाठी लढायला हवे.

– अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, नागपूर.