रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय राखून

नागपूर : विभाग नियंत्रक कार्यालयाने बुधवारपासून पुन्हा आंदोलकांना निलंबित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज गुरूवारीही १५ आंदोलकांना निलंबित करण्यात आले. परंतु सेवा समाप्तीची नोटीस दिलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा निर्णय  महामंडळाने राखून ठेवला असला तरी शुक्रवारी त्यावर अंमल होण्याची शक्यता आहे.

नव्याने निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये घाटरोड आगारातील ५, सावनेर आगारातील ५, रामटेक आगारातील ५ अशा एकूण १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सगळे आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी सेवेवर येऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव टाकत होते. या नवीन निलंबनामुळे नागपूर विभागातील आजपर्यंतच्या निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता थेट १२९ कर्मचाऱ्यांवर पोहोचली आहे. त्यातच विभाग नियंत्रक कार्यालयाने मंगळवारी रोजंदारी गटातील कर्मचाऱ्यांसाठी सेवा समाप्तीची नोटीस काढली होती. त्याचे वितरण गुरुवारी केले गेले. त्यात २४ तासांत हे कर्मचारी सेवेवर हजर न झाल्यास त्यांना नोकरीवरून कायमचे हात धुवावे लागण्याचा इशारा दिला गेला. परंतु त्यानंतरही हे कर्मचारी सेवेवर यायला तयार नाहीत. त्यामुळे शुक्रवारी या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

आगारात खासगी बसचे प्रवेश रोखणारे कोण?

राज्यातील बहुतांश भागात एसटीच्या आगारात खासगी बस आणि कारला  प्रवेश दिला जात आहे. अतिरिक्त मुख्य सचिवांचे त्याबाबत आदेशही आहेत. परंतु  गणेशपेठ बसस्थानकात अद्यापही खासगी बसला प्रवेश नाही. त्यामुळे येथील खासगी वाहन स्थानकाच्या बाहेर रस्त्यांवर लागत असल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे येथे खासगी बसेसला प्रवेश नाकारणारे अधिकारी कोण, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच काही खासगी बसेसवर गुरुवारी बसस्थानकाच्या २०० मिटरच्या आत असल्याबाबत कारवाई झाल्याचे नागरिकांनी सांगितले.  येथे वाहनांची पळवा-पळवी झाल्याने प्रवासी घाबरले.  आरटीओकडून एका स्कूलबसवर  कारवाई केली गेली. या स्कूलबसकडे परवाना व योग्यता प्रमाणपत्रच नव्हते. त्यामुळे अपघाताचा धोका बघता ही कारवाई केल्याची माहिती आहे.