नागपूर : संपात सहभागी आणखी १५ एस.टी. कर्मचारी गुरुवारी सेवेत परतले. आता केवळ २८ कर्मचारी संपावर कायम आहेत. दुसरीकडे मोठय़ा संख्येने कर्मचारी कामावर परतल्याने नागपुरहून पुणे, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, अकोला या लांब पल्ल्याच्या फेऱ्याही सुरू झाल्या आहेत. नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाच्या अखत्यारित गुरुवारी सेवेवर परतलेल्यांमध्ये ६ चालक, ५ वाहक, २ चालक तथा वाहक, २ यांत्रिक अशा एकूण १५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ९ ते २० एप्रिलदरम्यान परतलेल्या

चालकांची संख्या ५६३, वाहक ४४२, चालक तथा वाहक ६६, यांत्रिक २८६, प्रशासन ४३ अशी एकूण १,४०० कर्मचाऱ्यांवर पोहचली आहे. तर सेवेवर कर्मचारी वाढल्याने आता नागपूरहून संपापासून बंद पडलेली लांब पल्ल्याची पुणे, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, रायपूर, अकोला, राजनांदगाव, आदिलाबाद, हैदराबाद या लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. गुरुवारी दिवसभरात वेगवेगळय़ा आगारातील ३७८ बसेसने वेगवेगळय़ा १ लाख १५ हजार किलोमीटरहून अधिक किलोमीटर मार्गावर १,२८४ फेऱ्या केल्या. त्यात ४८ हजार ९८६ प्रवाशांची वाहतूक केल्याने महामंडळाला ३४ लाख ४८ हजार १५२ रुपयांचा महसूल मिळाला.

निम्म्या शिवशाही बंदच

नागपूर जिल्ह्यात ३७ शिवशाही बसेस आहेत. पैकी १५ बसेस सुरू झाल्या झाल्या. उर्वरित बंद आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत सर्व बसेस सुरू होणार असा, दावा विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी केला.