वर्धा: ऑक्सफोर्ड, हॉरवर्ड या जागतिक स्तरावर नावाजलेल्या प्रतिष्ठित विद्यापीठाप्रमाणेच स्टँनफोर्ड हे एक विख्यात विद्यापीठ म्हणुन ओळखल्या जाते. १८८५ साली अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली येथे स्थापन या विद्यापीठाचा परिसर जगातील सर्वात मोठ्या व सुंदर परिसरातील एक अव्वल समजल्या जातो. नेहमी टॉप ३ मध्ये राहणाऱ्या या विद्यापीठातील वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व अन्य शाखातील संशोधन उच्च पातळीचे असते. ईथे प्रवेश मिळणे अत्यंत दुर्लभ बाब समजल्या जात असून विविध उपक्रमात पण या विद्यापीठाचा दबदबा असतो.
१५ प्राध्यापकांची नोंद
तर अशा या प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड विद्यापीठात चमकदार कामगिरी करीत लक्ष वेधून घेणाऱ्या प्राध्यापकांची नावे पूढे आली आहे. येथील अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (अभिमत विद्यापीठ) येथील पाच प्राध्यापक आणि दहा सहयोगी प्राध्यापकांचा स्टॅनफोर्ड-एल्सेव्हियरच्या जगातील टॉप २% शास्त्रज्ञांच्या प्रतिष्ठित यादीत समावेश झाला आहे. संशोधनातील उत्कृष्टता, वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान आणि जागतिक स्तरावरील संशोधनाचा प्रभाव या निकषांवर ही यादी तयार केली जाते. या यशामुळे संस्थेच्या संशोधन क्षेत्रातील योगदानाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.
डॉ. सोनाली चौधरी व अन्य
यावर्षी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. सोनाली जी. चौधरी यांचा प्रथमच या प्रतिष्ठित यादीत समावेश झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, महत्त्वपूर्ण संशोधन तसेच आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची ही दखल आहे. तसेच, डॉ. महलकुआ नाझली खतीब, डॉ. अभय एम. गायधने, डॉ. सौरभ राम बिहारी लाल श्रीवास्तव आणि डॉ. जहिरुद्दीन सय्यद क्वाझी या चार प्राध्यापकांनी सलग चौथ्या वर्षी या यादीत स्थान मिळवले आहे.
अदानी विद्यापीठ चमकले
याशिवाय, संस्थेशी संबंधित दहा सहयोगी प्राध्यापकांचाही या यादीत समावेश झाला आहे. संशोधकांच्या संशोधनाचा प्रभाव, संशोधनाला मिळालेले संदर्भ, संशोधनातील उत्पादकता आणि संबंधित विषयातील योगदान अशा विविध निकषांच्या आधारे या यादीसाठी निवड केली जाते. प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांच्या या यशामुळे संस्थेतील संशोधन, शैक्षणिक सहकार्य आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे.
संस्थेतर्फे झाला गौरव
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या व्यवस्थापनाने सर्व प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांचे अभिनंदन केले. त्यांच्या मेहनतीचे, चिकाटीचे आणि संशोधनातील उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्यात आले. त्यांच्या संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रातील नवनवीन शोधांना चालना मिळत असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेची प्रतिष्ठा वाढण्यास मदत होत आहे. अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चने सर्व संशोधकांचे अभिनंदन करून त्यांच्या भविष्यातील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
