नागपूर : राज्यातील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहात असून मोठय़ा प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्याचबरोबर राज्यात ३७ हजार १०२ उद्योगधंदे आहेत. परिणामी, उर्जेची मोठय़ा प्रमाणात मागणी आणि त्या अनुषंगाने हवा प्रदूषणाचा ताण राज्यावर येत आहे. राज्यात ‘पीएम १०’ म्हणजेच अतिसूक्ष्म धुळींच्या कणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

उत्कल विद्यापिठाचे डॉ. सरोज कुमार साहू आणि ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स स्टडिज’चे प्रा. गुफ्रान बेग यांच्या नेतृत्त्वाखाली संशोधकांच्या चमू विविध प्रादेशिक स्त्रोतांची भूमिका आणि बदलणारी धोरणे विचारात घेऊन अनेक गंभीर हवा प्रदूषके आणि हरितगृह वायूंच्या स्त्रोतांचा गाव तसेच शहर पातळीवर ‘डेटाबेस’ तयार करत आहेत. या अभ्यासानुसार रस्त्यावरील धुळीचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच २९ टक्के, त्यापाठोपाठ निवासी क्षेत्रातील धुळीचे प्रमाण २२ टक्के, वाहतूक क्षेत्रातील धुळीचे प्रमाण दहा टक्के यांचा समावेश आहे.

उद्योगधंदे आणि औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांचा राज्यातील ‘पीएम १०’ च्या उत्सर्जनामध्ये मुख्य सहभाग आहे. तसेच महापालिका क्षेत्रात तयार होणारा घनकचरा उघडय़ावर जाळला जाणे आणि रस्त्यावरील विक्रेते यांचे आव्हान नव्याने निर्माण झाले आहे. कारण ‘पीएम १०’ च्या उत्सर्जनाला ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे अनेक हवा प्रदूषके ही सहजपणे वातावरणात मिसळली जातात. संपूर्ण देशभरातच राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके पूर्ण करु न शकणारी १३२ शहरे आहेत. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार राज्यात अशी १९ शहरे आहेत. 

  •   राज्यातील राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानके पूर्ण करु न शकणाऱ्या शहरांपैकी नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती या शहरातील ‘पीएम १०’ च्या उत्सर्जनाचा विचार या अभ्यासादरम्यान प्राथमिक परिक्षणासाठी करण्यात आला. नागपूर शहरातील उत्सर्जन हे चंद्रपूर आणि अमरावतीच्या तुलनेत अधिक असले तरी या दोन शहरांच्या मानाने नागपूरचे क्षेत्रफळ लक्षणीयरित्या अधिक आहे. नागपूर येथील ‘पीएम १०’च्या उत्सर्जनाचा भार हा १०५ गिगा ग्रॅम प्रति वर्ष इतका अंदाजित असून चंद्रपूर ७८ गिगा ग्रॅम प्रति वर्ष तर अमरावती ५३ गिगा ग्रॅम प्रतिवर्ष इतका अंदाजित आहे.
  • नागपूर शहरात नोंदणीकृत २१३ मोठे आणि मध्यम उद्योग आहेत. तर शहर परिसरात चार हजार ८५६ मेगावॅट क्षमतेचे कोळसाधारित ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत. चंद्रपूर शहरात १७८ नोंदणीकृत मध्यम व मोठे उद्योग आहेत. तर जिल्ह्यात सुमारे चार हजार ७८० मेगॉवॅट क्षमतेचे कोळसाधारित औष्णिक विद्युत केंद्र आहेत. अमरावती जिल्ह्यात एक हजार ३५० मेगावॅट क्षमतेचे कोळसाधारित औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. तर एकूण ४७ नोंदणीकृत मध्यम उद्योगधंदे आहेत.