भंडारा : शहरात एका सरकारी अधिकाऱ्याला लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे. राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांनी त्यांच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वत: स्वीकारली. लाच स्वीकारताना, त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांची घर झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बंद पडलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वस्तू व कर विभागाच्या (जीएसटी) राज्य कर निरीक्षकाला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी भंडारा येथील वस्तू व कर विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.

मनीष मुरलीधर सहारे (५०) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचा जीएसटी क्रमांक ऑक्टोबर ३०२५ पासून बंद आहे. हा क्रमांक पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी २ नोव्हेंबर २०२५ रोजी जीएसटी विभागाला ऑनलाइन अर्ज सादर केला होता. यानंतर त्यांना जीएसटी विभाग नागपूर येथून त्यांच्या फर्मचे लेझर शीट बनवून त्याप्रमाणे चालान भरून पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यावर तक्रारदार यांनी लेझर शीट तयार करून १० हजार ४२८ रुपये चालान भरले.

यानंतर तक्रारदार यांनी वस्तू व सेवा कर विभाग भंडारा येथील राज्य कर निरीक्षक सहारे यांची भेट घेतली व त्यांचा जीएसटी क्रमांक अद्याप सुरू झाला नसल्याबाबत सांगितले. तेव्हा सहारे यांनी तक्रारदार यांना त्यांचा बंद असलेला जीएसटी क्रमांक पुन्हा सुरू करून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १५ जानेवारी रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. १७ जानेवारी रोजी पथकाने सहारे यांच्या कार्यालयात पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याचे दिसून आले.