यवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांत दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमणात वाढले आहे. या चोरीमागचे मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत पाच लाख २५ हजार रुपये आहे. ही कारवाई अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. श्रीकृष्ण उर्फ शिर्या सोळंकी (२५, रा. शिवाजी चौक, कळंब), सुरेश उर्फ विकास दत्तराव सुरोशे (३३, रा. करंजी, रा. यवतमाळ), अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. ५ फेब्रुवारी रोजी रुपराव मधुकर पोहेकर, रा.पिंपळगाव यांनी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक पेट्रोलिंगवर असताना श्रीकृष्ण उर्फ शिऱ्या हा एक दुचाकी घेऊन वडगाव नाका येथील चहा कॅन्टीनवर असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी त्याकडील दुचाकीबद्दल विचारपूस केली. त्याने सदर दुचाकी एकविरा चौकातून चोरी केल्याची कबुली दिली. साथीदार सुरेश उर्फ विकास याच्यासह बाभूळगाव, यवतमाळ व इतर ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दोघांनाही ताब्यात घेवून त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या एकूण ११ दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोघांकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली.