अकोला : दोन गटातील किरकोळ वादातून दगडफेक झाल्याची घटना सोमवारी रात्री वाशीम शहरातील पाटणी चौकात घडली. या घटनेचे पडसाद शहरातील इतर भागातही उमटले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त केले. या दगडफेकीच्या घटनेत दोन ते तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दगडफेक प्रकरणात पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. आतापर्यंत सहा जणांना ताब्यात घेतले. वाशीम शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे. दगडफेकीच्या घटनेची चित्रफीत देखील समाजमाध्यमांवरून प्रसारित झाली आहे.

वाशीम शहरातील पाटणी चौकामध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या वादाचे पडसाद दंडे चौक, गणेशपेठ भागात उमटले. दोन समाजातील काही समाजकंटकांनी परिसरातील निवासस्थाने व वाहनांवर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीच्या घटनेमध्ये दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

दगडफेकीच्या घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शहरातील इतर भागात देखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दगडफेकीमध्ये काही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आरोपींची धरपकड सुरू केली.

तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेता परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. घटनास्थळावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीस कुमक देखील घटनास्थळावर तैनात करण्यात आला आहे. वाशीम शहरात सध्या संपूर्णतः परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वाशीम पोलिसांकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

… तर कडक कारवाई करणार वाशीम शहरात किरकोळ वादातून झालेल्या दगडफेकीदरम्यान नागरिकांनी संयम ठेवण्याची गरज आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरामध्ये समाज माध्यमातून किंवा इतर मार्गाने अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिला. शहरातील नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना योग्य सहकार्य करावे, असे देखील त्यांनी सांगितले.