नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-कहांडला अभयारण्याअंतर्गत व्याघ्रप्रकल्पाच्या मार्गिकेवरील लोहखनिज खाण रद्द करण्यासाठी देशभरातील वन्यजीवप्रेमी एकवटले आहेत. ‘स्टॉप लोहारडोंगरी माईन : सेव्ह ताडोबा-ब्रह्मपुरी टायगर कॉरिडॉर’ या नावाने ‘ऑनलाइन स्वाक्षरी’ मोहिमेने आता दहा हजारांचा टप्पा गाठला आहे.
राज्य वन्यजीव मंडळाने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाघांच्या मार्गिकेतील या खाणीला मंजुरी दिली. तज्ज्ञ सदस्यांनी केलेला विरोध डावलून वाघांचा अधिवास तोडणाऱ्या या लोहखनिज खाणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ३५.९४ हेक्टर आरक्षित वनक्षेत्रावर हा खाण प्रकल्प असून तब्बल १८ हजार ०२४ झाडे त्यासाठी तोडण्यात येणार आहे. ब्रम्हपुरी वनविभागातील दाट वनक्षेत्राचा गाभा असलेले हे जंगल घोडाझरी अभयारण्यालगत आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांची मूळ संख्या ब्रम्हपुरी-गडचिरोली परिसराशी आणि उत्तरेकडील वाघबहुल वनांशी जोडणारा अतिशय महत्त्वाची ही व्याघ्रमार्गिका आहे. ६० पेक्षा अधिक वाघ तसेच असंख्य दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी या मार्गिकेतील जंगलात आहेत. जैवविविधतेच्या दृष्टीने हे जंगल अनेक अधिसूचित संरक्षित क्षेत्रांपेक्षाही अधिक मौल्यवान आहे. विशेषकरून वाघ आणि बिबट्यासारख्या ‘फ्लॅगशिप’ प्रजातींसाठी हे जंगल म्हणजे जीवनरेषा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी येथील प्रस्तावित खाण प्रकल्प हा केवळ विकासाचा मुद्दा नाही. तो येथील पर्यावरण, वन्यजीव आणि मानवी जीवनावर थेट आघात करणारा गंभीर धोका ठरत आहे. या भागात वास्तव्यास असलेले नागरिक मानव-वन्यजीव संघर्षाचे दुष्परिणाम रोज अनुभवत आहेत.
गेल्या एका वर्षातच या संघर्षात ४७ निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीत खाण प्रकल्पाला परवानगी देणे म्हणजे या संकटात आणखी भर घालण्यासारखे आहे. कालवे, सिंचन प्रकल्प, रस्ते रुंदीकरण यांमुळे आधीच जंगलाचे तुकडे झाले असून, मोठे मांसाहारी प्राणी ‘कोंडीत’ सापडले आहेत. परिणामी, मानव-वन्यजीव संघर्षाने अलीकडच्या काळात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे आता पर्यावरण, निसर्ग, वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या ऑनलाईन स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून देशपातळीवरील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रकल्पामुळे विनाशकारी परिणाम
हा लोहखनिज प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास लोहारडोंगरीतील लोखंड खाणकाम तसेच त्यासाठी होणारे रस्ते बांधकाम व वाहतूक यांचे परिणाम दूरगामी आणि विनाशकारी असतील. हजारो झाडांची कायमस्वरूपी नासधूस आणि वन्यजीवांच्या अधिवासाचा नाश होणार आहे. हवा व पाण्याच्या तीव्र प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असून त्याचा मानवी आरोग्यावर थेट परिणाम होणार आहे. जंगलाचे अधिक तुकडे झाल्याने वाघ व बिबटे मानवी वस्तीच्या अधिक जवळ येतील आणि मानवी जीविताला धोका वाढेल. या प्रकल्पातून १२० जणांना रोजगार मिळेल, पण त्यातही केवळ ३२ जणांचा रोजगार कायमस्वरूपी असणार आहे. हा प्रकल्प पुढील अनेक दशकांसाठी संघर्षाचे आणि बळींचे नवे पर्व सुरू करू शकतो. लोहखनिज प्रकल्पासाठी १८ हजार झाडांची तोड आणि व्याघांच्या मार्गिकचा विनाश हा केवळ चंद्रपूरचा प्रश्न नाही, तर एकूणच व्याघ्र संवर्धनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य बंडू धोतरे यांनी सांगितले.
वाघ-मानव संघर्षाला पुन्हा आमंत्रण
चंद्रपूर जिल्ह्यातील गेल्या पाच वर्षात वाघ व इतर वन्यप्राणाच्या हल्ल्यात २०० मानवी बळी घेणाऱ्या वाघ-मानव संघर्षाला पुन्हा आमंत्रण देणे हा विकासाचा कोणता निकष आहे ? सुमारे १० हजार नागरिकांनी या मोहिमेवर स्वाक्षरी करून सरकारला स्पष्ट संकेत दिला आहे की, आम्हाला खाण नको तर जंगल-निसर्ग समृद्ध हवे आहे. राज्य वन्यजीव मंडळाने या प्रकल्पाला घातलेल्या अटी ही केवळ निसर्गाची आणि संघर्षात असलेल्या या जिल्हयाची थट्टा आहे. जोपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य बंडू धोतरे म्हणाले.

