scorecardresearch

नागपूर : नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवा, उच्च न्यायालयाचे आदेश

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे न्यायालय मित्राने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

नागपूर : नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवा, उच्च न्यायालयाचे आदेश
नायलॉन मांजा (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : बंदी असलेल्या नायलॉन मांजाची फेसबुकवरील ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवा, असे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने नागपूर पोलिसांच्या सायबर सेल विभागाला बुधवारी दिले.

नायलॉन मांजाची ऑनलाइन विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे न्यायालय मित्राने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे, न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. वृषाली जोशी यांनी नायलॉन मांजाची फेसबुकवरून ऑनलाइन विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. बुधवारी सुनावणी झाली असता नायलॉन मांजाला प्रतिबंध करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे विविध पातळीवर समित्या गठित केल्याची माहिती दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विविध निर्देश दिले आहेत.

हेही वाचा – नागपूर : पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात ; विद्यापीठ प्रशासनाचा विरोधाभासी निर्णय

जिल्हा पातळीवर पाहणी करणारी समिती तयार करण्यात आली आहे. तालुका, ग्रामपंचायत आणि झोन पातळीवरही समित्या तयार करण्यात आल्या असून यात विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, पोलीस उपायुक्त, महामेट्रो यांचा समावेश करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करणाऱ्या ठिकाणी धाडी टाकून जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालय मित्र ॲड. देवेन चव्हाण, बोर्डातर्फे ॲड. रवि सन्याल, मनपातर्फे ॲड. जेमिनी कासट, सरकारतर्फे ॲड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा – नागपूर : धर्म आचरणाने वाढतो, डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन

येथे करा तक्रार

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आज पोलीस विभागाने तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यावर विक्री आणि वापराबाबत माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या सर्व सामाजिक माध्यमांवर याकरिता ९८२३३००१०० हा क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 09:45 IST

संबंधित बातम्या