वर्धेतील महिलेत आढळलेला विषाणूचा स्ट्रेन ‘ब्रिटन’चा!

स्ट्रेन नवीन की जुना हे कळत नसल्याने प्रशासनाला नियोजनात अडचणी येत आहेत.

नागपूर : वर्धेतील एका कोरनाबाधित महिलेत आढळलेला करोनाचा नवीन स्ट्रेन हा ब्रिटनमधील असल्याचे पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने (एनआयव्ही) पाठवलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या महिलेचा नागपूर प्रवासाचा इतिहास असून त्यानंतर तिला करोनाची बाधा झाली. परंतु नागपुरातून पाठवलेल्या नमुन्यांच्या अहवाल एनआयव्हीकडून अद्याप मिळाला नसल्याने नागपुरातील स्ट्रेनबद्दल सांगता येत नाही, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

वर्धेतील ही महिला नागपुरातील मनीष नगर येथील नातेवाईकाकडे आली तेव्हा या नातेवाईकांना करोनाची लागण झाली होती. परत गेल्यावर तिलाही बाधा झाली. उपचारांदरम्यान तिचे नमुने एनआयव्हीकडे पाठवण्यात आले होते. एनआयव्हीच्या चाचणीत महिलेतील विषाणू हा बी- ११७ संवर्गातील असून तो ब्रिटनचा असल्याचे स्पष्ट झाले. करोनाच्या जुन्या विषाणूच्या तुलनेत हा नवीन स्ट्रेन ६० ते ७० टक्के  जास्त वेगाने संक्रमण वाढवतो. दरम्यान, नागपुरातील रुग्णांचे सवाशे ते दीडशे नमुने स्ट्रेनच्या चाचणीसाठी पाठवले आहेत. अद्यापही त्याचा अहवाल नाही. त्यामुळे हा स्ट्रेन नवीन की जुना हे कळत नसल्याने प्रशासनाला नियोजनात अडचणी येत आहेत. या विषयावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे. त्यांनी येत्या एक ते दोन दिवसांत हा अहवाल मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यामुळे येथील स्ट्रेनची माहिती लवकरच मिळण्याची आशा असून त्यानुसार आणखी प्रभावी उपाय केले जातील, असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे विशेष कार्य अधिकारी योगेश कुंभेजकर उपस्थित होते.

नागपुरातील टाळेबंदी मागे

नागपुरात मागील एक आठवड्यापासून सुरू असलेली टाळेबंदी मागे घेण्यात आली असून निर्बंध मात्र अधिक कठोर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या बघता १५ ते २१ मार्चपर्यंत असणारे निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहेत. हॉटेल्स आणि उपाहारगृह संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तर सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार-रविवारी मात्र जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व बाजारपेठा बंद राहतील, अशी माहिती राऊत यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Strain of the virus found in a woman in wardha belongs to britain akp

ताज्या बातम्या