नागपूर : नागपुरात मोकाट श्वानांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सोमलवाडा भागात एका ज्येष्ठ महिलेवर मोकाट श्वांनानी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. मोकाट श्वानांमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना फिरणे कठीण झाले असून महापालिका प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास होत आहे. मात्र शहरातील विविध भागात मोकाट श्वानांचा उच्छाद वाढला आहे. गेल्या वर्षभरापासून मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया होत नसल्याने संख्याही वाढत आहे. विशेष म्हणजे, शहरात मोकाट श्वानांची संख्या किती आहे याची ठोस आकडेवारी आरोग्य विभागाकडे नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी ज्येष्ठ महिला शुभांगी श्यामकात देशपांडे या सोमलवाडा परिसरात सकाळी साडेपाचच्या सुमारास फिरत असताना उदयन अपार्टमेंटच्या समोर परिसरातील काही मोकाट श्वांनानी त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांना पायाला, हातावर चावा घेतल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. देशपांडे यांच्या नातेवाईकांनी महापालिकेत याबाबत तक्रार केली मात्र त्याची दखल घेतली नाही.

हेही वाचा…नागपूर : स्फोटात सहा जणांचा कोळसा झालेल्या दारूगोळा कंपनीच्या मालकाला अखेर बेड्या, आता स्फोटामागची खरी माहिती…

यापूर्वी कामठी आणि वाडीमध्ये लहान मुलांवर व एका ज्येष्ठ नागरिकांवर श्वांनानी हल्ला केला होता. त्यात कामठीमध्ये लहान मुलगा दगावला होता. मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात ज्येष्ठ नागरिकांना सकाळ- संध्याकाळ मोकळ्या वातावरणात फिरणे कठीण झाले आहे.

विशेषत: रात्रीच्या वेळी मोकाट श्वान दुचाकीस्वारांच्या पाठीमागे धावत असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. शहरात दरवर्षी कुत्र्यांनी चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. मात्र महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत असल्याने नागरिकांच्या त्रासात मोठी वाढ झाली आहे. मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रियाही ठप्प झाली. मोकाट श्वानांचा प्रश्न शहरासाठी नवा नाही मात्र महापालिका त्यावर उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरली आहे.

हेही वाचा…नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना कुठल्या सुट्ट्या राहणार माहिती आहे का? आताच बघा व सुट्ट्यांचे नियोजन करा

आरोग्य विभागाकडील आकडेवारीनुसार, शहरात मिळून मोकाट श्वानांची संख्या ४० हजाराच्या आहे. मात्र ही संख्या त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. महापालिकेने दरवर्षी ५ हजार मोकाट श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. मात्र वर्षाला एक ते दीड हजार शस्त्रक्रिया होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असले तरी गेल्या सहा महिन्यांपासून नसबंदीची प्रक्रिया बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे.