वर्धा : कोणतीही परीक्षा म्हटली की काही निर्बंध आलेच. मंडळ परीक्षेत राज्य कॉपीमुक्त करण्यासाठी असेच कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक निर्बंध आता शिक्षक पात्रता परीक्षेसाठी लावण्यात आलेले आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही आता ७ व ८ फेब्रुवारीस होत आहे. ही सी – टीईटी परीक्षा गोंधळमुक्त वातावरणात व अनुचित प्रकार नं घडता पार पडावी यासाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहे. त्यात वेशभूषा व अन्य बाबत कसे असावे व कसे नसावे हे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिटीईटी परीक्षेसाठी ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. सिबिएसीइने या परीक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. सुरक्षा तपासणीत होणारा विलंब टाळण्यासाठी आणि कोणताही ताण नं घेता केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे परीक्षा समितीने म्हटले आहे. समितीने कोणताही ठराविक असा गणवेश निश्चित केलेला नाही. मात्र साधे आणि आरामदायी कपडे घालण्याचा सल्ला दिला आहे. हलक्या रंगाचे व साधे कपडे म्हणजे शक्यतो फिकट रंगाचे कपडे असावे. या ड्रेसवर मोठे बटण, बॅजेस, नक्षीकाम किंवा अनेक झिप नसाव्या. अर्ध्या बाह्यांचे कपडे तपासणी करण्यास सुलभ ठरतात म्हणून पूर्ण बाह्या ऐवजी अर्ध्या बाह्यांचे शर्ट किंवा टॉप घालणे श्रेयस्कर ठरेल.
सपाट टाचेचे सॅंडल किंवा साध्या चपला घालणे उत्तम ठरेल. जाड तळवे असलेले बूट किंवा धातूचे भाग असलेले पादत्राने घालू नका. उंच टाचेच्या सॅंडलमुळे सुरक्षा तपासणीत अडथळा येवू शकतो. दागिने किंवा तत्सम दिखाव्याच्या धातूच्या वस्तूमुळे मेटल डिटेक्टरमध्ये अडचण येते. म्हणून अंगठी, साखळी, ब्रेसलेट, पैंजण, कानातले डूल, केसांना लावायचे क्लिप्स किंवा शोभेच्या बाबी टाळाव्या. म्हणजेच परीक्षा दिनी कोणताच दागिना नं घालणे हा सर्वात सुरक्षित पर्याय, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा मंडळाने हिजाब किंवा फेटा ( तुर्बान ) या सारख्या धार्मिक पेहरावास परवानगी दिली आहे. मात्र अश्या उमेदवारांनी सुरक्षा तपासणीसाठी ठराविक वेळेच्या आंत परीक्षा केंद्रावर पोहचणे अनिवार्य आहे.
परीक्षा केंद्रात मोबाईल, स्मार्ट वॉच, फिटबिट, ब्लू टूथ, इअर फोन, कॅमेरा, पेन ड्राईव्ह यास मनाई आहेच. पुस्तके, नोट्स, कागदाचे तुकडे, कॅलक्यूलेटर, जोमेंटरी बॉक्स, पेन्सिल, खोड रबर, स्केल, हँडबॅग, गॉगल, कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ नेण्यास पण मनाई करण्यात आली आहे.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारास फक्त काहीच बाबी नेता येतील. प्रवेशपत्राची मूळ प्रत, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्राइव्हिंग लायसन, निळ्या किंवा काळ्या रंगाचा बॉल पॉईंट पेन केंद्रात नेता येणार आहे.पाण्याची पारदर्शक बाटली, ती पण जर केंद्राने परवानगी दिली असेल तर. परीक्षा केंद्रावर प्रवेशापूर्वी उमेदवारांची मेटल डिटेक्टर मार्फत कसून तपासणी होणार. नियम नं पाळल्यास प्रवेश नाकारल्या जाईल किंवा उमेदवारी रद्द ठरेल. सुरक्षा तपासणीत होणारी घाई टाळण्यासाठी केंद्रावर किमान ९० मिनिटे आधी पोहचावे, असे सूचित करण्यात आले आहे.

