लोकसत्ता टीम

नागपूर : कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राला रात्रीला पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या युवक अंबाझरी तलावावर पोहचला. पहाटे तीन वाजता पंपहाऊसवर बसून दोघेही पब्जी खेळत होते. दरम्यान, पब्जी खेळण्यात मग्न असलेल्या त्या युवकाचा पाय घसरला आणि पाण्यात पडला. काही मिनिटांतच त्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.

पुलकित राज शहदादपुरी (१६) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अकरावीचा विद्यार्थी होता. जरीपटक्यातील एका महाविद्यालयात शिकत होता. ११ जूनला त्याचा वाढदिवस होता. त्याने सकाळीच नवे कपडे खरेदी केले आणि सायंकाळी कुटुंबियांनी त्यासाठी वाढदिवसांच्या पार्टीचे आयोजन केले. त्याने कुटुंबीयांसह वाढदिवस साजरा केला. घरी मित्रांना बोलाविले. केक कापला आणि वाढदिवसाचा आनंद साजरा केला. रात्री उशिरापर्यंत तो घरीच होता. कुटुंबातील सदस्य झोपी गेल्यानंतर हळूच दार उघडून तो बाहेर पडला. जाताना बाहेरून दार लावले आणि मित्र ऋषी खेमानी (१७) याच्यासोबत जरीपटक्यात गेला. मित्राला पार्टी द्यायची होती. यासाठी तो दुकान शोधत होता.

आणखी वाचा-बच्चू कडू महायुतीची साथ सोडणार? आगामी विधानसभा निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा; म्हणाले…

जरीपटक्यात फिरल्यानंतर पहाटेच्या सुमारास तो शंकर नगरात गेला. परंतु एवढ्या सकाळी एकही दुकान उघडे नव्हते. वेळ घालविण्यासाठी दोघेही अंबाझरी तलाव येथील पंप हाऊसजवळ गेले. दोघेही मोबाईलवर पब्जी गेम खेळत बसले. पहाटे तीन वाजता नाश्त्याचे दुकान उघडल्याचे लक्षात आल्याने दोघेही तेथून उठले. आधी ऋषीने मोबाईलच्या प्रकाशात खड्डा पार केला. त्याच्या मागे पुलकित होता. मात्र, पुलकित मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त होता. त्याला खड्डा दिसलाच नाही. त्यामुळे तो १५ फूट खड्ड्यात पडला. ऋषीला आवाज येताच त्याने मागे वळून बघितले असता पुलकित दिसला नाही. त्याने आरडाओरड केली. कुटुंबीय तसेच पोलिसांना माहिती दिली. अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अग्निशमन जवानांच्या मदतीने पुलकितचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर पार्थिव कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

आणखी वाचा-बल्लारपूर- गोंदिया दरम्यान रेल्वेचा १४ तासांचा मेगाब्लॉक,दोन मेमू पॅसेंजर रद्द, दरभंगा, कोरबा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल

कुटुंबावर शोककळा

काही तासांपूर्वीच मुलाचा वाढदिवस साजरा करीत दीर्घआयुष्यी होण्याचा आशिर्वाद दिला, त्याच मुलाला आज निरोप देण्याची वेळ आईवडिलांवर आली. तसेच पुलकितला नुकताच महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला नवीन दुचाकी भेट देण्याचे कुटुंबियांनी ठरवले होते. मात्र, वाढदिवशीच पुलकितचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर शोककळा परसरली.

अंबाझरी तलावाचा काळाकुट्ट इतिहास

अंबाझरी तलावाचा आतापर्यंतचा काळाकुट्ट इतिहास आहे. गेल्या दीड वर्षांत अंबाझरी तलावात १८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी १० जणांचा पोहण्याच्या मोह न आवरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थ्याचा पोहताना मृत्यू झाला होता. अंबाझरी तलावावर सुरक्षेबाबत कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पाण्यात बुडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली आहे.