नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतून (एम्स) वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आणखी एका विद्यार्थीनीने सायंकाळी तिच्या सदनिकेत गळफास लावून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी हा प्रकार निदर्शनास आल्याने एम्समध्ये खळबळ उडाली आहे. समृद्धी कृष्णकांत पांडे (२५) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पुणे येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी आहे.
एम्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या त्वचारोग विभागात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी असलेली समृद्धी ही नागपुरातील शिव कैलाश येथील मंजिरा अपार्टमेंटमध्ये राहत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्समध्ये त्वचारोगशास्त्रात प्रवेश घेतल्यापासून ती तणावाखाली वावरत होती. या शाखेतील भविष्यातल्या संधीवरून तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. १२ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती खोलीत गेली. तिची मैत्रिण सुहानी संजय जैस्वाल ही सदनिकेत परतली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. सुहानीने पाठीमागच्या बाजूने खोलीत प्रवेश केला असता, तिला समृद्धी छताच्या पंख्याला लटकलेली आढळली. तिने तत्काळ महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला.
या आत्महत्येच्या घटनेमुळे नागपूरच्या एम्समध्ये खळबळ उडाली आहे. एवढी हुशार, सभ्य आणि आशादायक विद्यार्थिनी टोकाचे पाऊल उचलल्याने शैक्षणिक वर्तुळाला धक्का बसल. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी तिच्या वर्गमित्रांकडे विचारपूस सुरू केली आहे.
एम्समधील तिसरी आत्महत्या
नागपूरात एम्स सुरू झाल्यापासून विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. काही महिन्यांपूर्वी चरक वसतिगृहाच्या खोली क्रमांक ९०९ मध्ये संकेत पंडितराव दाभाडे (२२) या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केली होती. संकेत हा मुळचा परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर येथील रहिवासी होता. एम्समधूनच वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदवी शिक्षण घेतलेला संकेत प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टर (इंटर्न) म्हणून रुग्ण सेवा देत होता. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी एम्स शिक्षण घेऊन परिसराच्या बाहेर रहात असलेल्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती.
