‘विद्यार्थी संसद’विरुद्ध संताप शिगेला ! विद्यापीठाला धार्मिक प्रचार केंद्र बनवण्यास विरोध

भाजपच्या अजेंडय़ावरील प्रमुख असलेला हा विषय ‘विद्यार्थी संसदे’मध्ये येणार असल्याने विरोध होत आहे

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे कुलगुरूंना निवेदन

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने प्रस्तावित ‘विद्यार्थी संसद’तील विषय आणि ठरावासंदर्भात ठेवण्यात आलेल्या गुप्ततेमुळे एका विशिष्ट विचारांचा प्रचार यातून केला जात असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर  विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ व युवा विद्यार्थी सेनेने आज गुरुवारी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन देत सर्वधर्मभाव, बंधुभाव व मानवतेचे शिक्षण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विद्यापीठाला धार्मिक कडवेपणाचे प्रचार केंद्र  व राजकारणाचा अड्डा बनवू नको, अशी मागणी केली.

विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व आणि नेतृत्वाला चालना देण्यासाठी विद्यापीठाने २९ आणि ३० ऑक्टोबरला श्रीमंत राजे रघुजी भोसले नगरभवन, महाल येथे ‘विद्यार्थी संसद’चे आयोजन केले आहे. देशभरात वाद निर्माण करणाऱ्या ‘समान नागरी कायद्या’वर या कार्यक्रमात विधेयक मांडले जाणार आहे. विशेष म्हणजे, एका विशिष्ट विचारधारेचे समर्थन करणारा आणि भाजपच्या अजेंडय़ावरील प्रमुख असलेला हा विषय ‘विद्यार्थी संसदे’मध्ये येणार असल्याने विरोध होत आहे. विद्यार्थी संसदेमध्ये अभाविप आणि भाजयुमो या संघटनांना हाताशी धरून हिंदुत्वनिष्ठ राजकारणाची मोट बांधली जात असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने केला आहे. धूर्त राजकारण करून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती ऐवजी कडवे हिंदुत्व पेरण्याचा हा मनसुभा आम्ही उधळून लावू. विशिष्ट विचाराच्या प्रचाराला जागा उपलब्ध करून द्यायला विद्यापीठाने पुढाकार घेण्याची गरज नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. विद्यार्थी संसद हा भाजपचा गुप्त अजेंडा असून तो उधळून लावू, असा इशाराही राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने दिला आहे. निवेदन देताना नीलेश कोढे, विक्रम राठोड, संदीप पटेल, नीलेश तिगरे, शंतनु शिर्के, बंटी दुर्वे, अभिजित डार्लिगे, विवेक वर्मा, सतीश बामणे आदी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

समिती स्थापनेबाबत कुलगुरू अनभिज्ञ

विद्यार्थी संसदेच्या नियोजनासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली आहे. यामध्ये अभाविप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा समावेशावर एनएसयूआयने आक्षेप घेतला असता या समितीसंदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही, याबाबत मी कुठलीही परवानगी दिली नाही, अशी कुठली समिती स्थापन झाल्याचे पत्रकही माझ्याकडे नाही, असे उत्तर कुलगुरू डॉ. चौधरी यांनी एनएसयूआयला दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आशीष मंडपे यांनी दिली. याचे संपूर्ण नियोजन प्र-कुलगुरू बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पात्रता फेरीच्या उद्घाटनापासून लांबच

विद्यार्थी संसदेमध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी पात्रता फेरी घेण्यात आली. या फेरीच्या उद्घाटन सोहळ्याला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली. एनएसयूआयकडूनही बुधवारी विद्यापीठाला निवेदन देत विद्यार्थी संसदेमधील विषय आणि समिती सदस्यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे कुलगुरूंनी सावध भूमिका घेत उद्घाटनाला उपस्थित राहणे टाळल्याचे बोलले जात आहे.

प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, विद्यार्थी कल्याणचे संचालक  डॉ. अभय मुदगल, व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Student union aggressive over subject and the resolution in student parliament zws

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच