scorecardresearch

नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार

परीक्षा शांततेत सुरू व्हावी यासाठी सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करतील याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले.

शाळा स्तरावर परीक्षेमुळे गैरप्रकार रोखण्याचे आव्हान

नागपूर : करोनानंतर पहिल्यांदाच शुक्रवारपासून होऊ घातलेल्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमधील परीक्षा केंद्र देण्यात आल्याने परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकार रोखण्याचे मोठे आव्हान विभागीय मंडळासमोर असणार आहे. नागपूर विभागातून १ लाख ६२ हजार ५१९ विद्यार्थी ही परीक्षा देतील. विभागातील १६२० कनिष्ठ महाविद्यालयांच्या १५३६ केंद्रांवर ही परीक्षा होईल.

परीक्षा शांततेत सुरू व्हावी यासाठी सर्व यंत्रणा योग्य पद्धतीने काम करतील याचे नियोजन करण्यात आल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले. यावेळी परीक्षा त्या-त्या कनिष्ठ महाविद्यालयातच घेण्यात येणार आहे. नागपूर विभागात १५३६  केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी ४७७ मुख्य तर १,०५९ उपकेंद्र आहेत. यावेळी उपकेंद्राची संख्या वाढवण्यात आल्याने परीक्षकांची जबाबदारी वाढली आहे. १४ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नजिकच्या शाळेतील केंद्र देण्यात आले आहे. 

४२ भरारी पथके

विभागीय मंडळाने परीक्षा केंद्रावर भेटी देण्यासाठी जिल्हानिहाय सहा पथके नेमली आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांच्या पथकांसह एकूण ४२ पथकांचा समावेश आहे. यापैकी केवळ २७ पथकेच क्रियाशील असल्याची माहिती आहे. दुसरीकडे उपद्रवी केंद्रांना आकस्मिक भेटी देऊन गैरप्रकारांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी  वर्ग-अ व वर्ग-ब च्या अधिकाऱ्यांशी दक्षता पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या पथकात उपजिल्हाधिकारी हेमा बडे, माधुरी तिखे, नायब तहसीलदार, ए.एस. जाधव, अरिवद जयस्वाल, योगीता यादव यांचा समावेश आहे.

‘इग्नू’च्या परीक्षा आजपासून

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२१व्या सत्रातील परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा ११ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय केंद्राचे संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी दिली. इग्नूच्या देश-विदेशातील केंद्रांमध्ये या परीक्षेला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावरून काढून घेता येणार आहेत.  इग्नूच्या नागपूर केंद्रावरून २७७९ विद्यार्थी परीक्षा देणर आहेत. यामध्ये नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नांदेड, बुलढाणा आणि गडचिरोलीमधील ९ परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर आणि अमरावती येथील कारागृहामध्ये दोन परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students division appear 12th standard examination preventing examinations school level ysh

ताज्या बातम्या