विद्यार्थ्यांनो, शेतीभिमुख संशोधनावर भर द्या!

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून पशुसंवर्धन हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे.

सर्वाधिक पुरस्काराची मानकरी रितू पांघल हिला सुवर्ण व रजत पदक देऊन गौरवताना सुनील केदार.

मंत्री सुनील केदार यांचे आवाहन; ‘माफसू’चा दहावा दीक्षांत सोहळा थाटात

नागपूर : शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून पशुसंवर्धन हा त्याचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पदवीधारकांनी शेतकरीभिमुख नवनवीन संशोधन करून देशाच्या उन्नतीत सहभाग द्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलपती व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केले. 

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचा(माफसू) दहावा दीक्षांत सोहळा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात बुधवारी थाटात पार पडला. यावेळी दीक्षांत भाषण करताना केदार बोलत होते. सर्वाधिक पदके पटकवणारी नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाची विद्यार्थिनी रितू पांघल हिचा सात सुवर्ण व चार रजत पदके देऊन गौरव करण्यात आला. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य उपस्थित होते.

पशुधन व्यवसायावर बोलताना केदार म्हणाले, पशुवैद्यकशास्त्र हे सखोल, विस्तृत व फार जुने असून त्याला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. पशुधन पालन हा जगातील जवळपास सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. त्यामुळेच विविध संस्थांमार्फत यावर अविरत संशोधन सुरू असते. यामध्ये नैसर्गिक संसाधनांची कमतरता, साधनांचा ऱ्हास, खाद्य आणि चाऱ्याची उणिव, संसर्गजन्य आजारांमुळे होणारे मृत्यू यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने पशुधन क्षेत्रातील प्रमुख समस्यांवर विद्यापीठाने संशोधन करावे. गाव हाच विश्वाचा मूळ घटक असतो. गावापासूनच शहर निर्माण होतात. देशाचा सर्वागिण विकास साधायचा असेल तर महात्मा गांधींच्या स्वप्नातील गावे तयार करावी लागतील. यातून देश सुधारेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेले केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक विभागाचे सचिव डॉ. शेखर मांडे म्हणाले, आजचा पदवीधर हा उद्याचा संशोधक आहे. त्यामुळे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय तसेच मत्स्यव्यवसायात कार्यरत  व्यावसायिकांमध्ये या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासंबंधी जागृत करणे ही देशातील सर्व पशुवैद्यक विद्यापीठांची प्रमुख जबाबदारी आहे. कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. संचालन डॉ. ए.पी. ढोक व डॉ. एस.एम. वानखेडे यांनी केले.

१२५३ पदव्यांचे वाटप

पदवीदान समारंभामध्ये १२५३ पात्र विद्यार्थ्यांना पदव्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ९३९ स्नातक, २७५ स्नातकोत्तर आणि ३९ आचार्य विद्यार्थ्यांचा समावेश होता. याशिवाय विशिष्ट गुणवत्तेकरिता ५९ सुवर्ण पदके, १५ रजत पदके आणि २५ हजार रुपयांची दोन रोख पारितोषिके यावेळी वितरित करण्यात आली. विशेष म्हणजे, एकूण पदकांपैकी २२ पदके आणि दोन रोख पुरस्कारांपैकी एक पुरस्कार हा विद्यार्थिनींनी पटकविला.  याशिवाय मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थिनी नांबीर जासना सुरेश हिने पाच सुवर्ण व एक रोख पारितोषिक पटकावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Students focus agricultural research ysh

ताज्या बातम्या