पालकांनी वेळीच सतर्क होण्याची गरज

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या शाळांकडूनच विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती खासगी शिकवणी वर्गासह अन्य संस्थांना विकली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पालकांनी सतर्क होण्याची गरज आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी पुढे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी शिकवणीचा आधार घेतात. हीच बाब ओळखून शाळाद्वांरे खासगी शिकवणी संस्थांना आपल्या शाळेतील दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती विकत असून खासगी शिकवणी वर्गाकडून पालकांना वारंवार संपर्क करून त्रस्त केले जात आहेत. विशेष म्हणजे, शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच्या अत्याचाराच्या घटना नित्याने कानावर पडत असताना शाळांकडूनच विद्यार्थ्यांच्या घरचा पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख,  वडिलांचा व्यवसाय अशी इत्यंभूत माहिती विकली जात आहे. सध्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावीचे शिक्षण पूर्ण झाले की बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणसाठी जेईई आणि नीट परीक्षेची शिकवणी लावतात. मागील काही वर्षांत या परीक्षांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. त्यामुळे जेईई आणि ‘नीट’च्या शिकवणीसाठी लाखो रुपये घेणाऱ्या नामवंत संस्थांनी देशभर आपले पाय पसरले.  या संस्थांचा डोळा हा विशेषत्वाने दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर असतो. हे विद्यार्थी पुढे शिकवणी लावणार या अपेक्षेने त्यांची संपूर्ण माहिती शाळांकडून विकत घेतली जाते. आपली माहिती शाळांकडे सुरक्षित आहे या अपेक्षेने पालक सर्व माहिती देतात. मात्र, आता शाळाच त्यांची माहिती शिकवणी वर्गाना विकत  आहेत. दरदिवसाला दहा ते पंधरा शिकवणी वर्गाकडून पालकांना संपर्क साधला जात आहे. आपली माहिती बाहेर जातेच कशी या चिंतेने पालकांना हैराण केले आहे. एका पालकाने सांगितले की, त्यांची मुलगी ही रामदासपेठ येथील सोमलवार शाळेची विद्यार्थिनी आहे. तीेने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून त्यांना रोज शिकवणी वर्गाकडून संपर्क केला जातो. शाळांनी विद्यार्थ्यांची अशी माहिती देणे गैर असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिकवणी वर्गाची शक्कल

शिकवणी वर्गातून पालकांशी संपर्क साधला जातो. त्यानंतर एक महिला आपल्या शिकवणी वर्गाचे नाव सांगून समुपदेशक बोलतेय म्हणून सांगते. तुमच्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आपण  वर्गाला भेट द्या, पाल्यांना काय करायला हवे हे आम्ही मार्गदर्शन करू अशा शब्दांमध्ये पालकांना आकर्षित केले जाते.

गैरप्रकाराचा धोका

शाळांकडील माहिती शिकवणी वर्गाकडे गेल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. विद्यार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक असे अनोळखी व्यक्तीकडे गेल्याने त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यात विद्यार्थिनींना अन्य प्रकारचा त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे अशा शाळांवर कारवाई करावी अशी मागणीही होत आहे.

आम्ही विद्यार्थ्यांची माहिती बाहेर देत नाही. त्यामुळे आमच्याकडून शिकवणी वर्गाना विद्यार्थ्यांची माहिती दिली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विद्यार्थ्यांकडून बाहेर कुठे सांगितलेली किंवा जुन्या शिकवणी वर्गाकडे असलेली माहिती इतरत्र जाण्याची शक्यता आहे.

वैशाली डाखोळे, मुख्याध्यापक, सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ.

शाळा अंतर्गत कामासाठी माहिती देत असेल तर हरकत नाही. मात्र, संबंधिताला विश्वासात न घेता ती इतरत्र देणे चुकीचे आहे.  हा गोपनीयतेचा भंग ठरतो.

सुकेशनी लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा.