नागपूर : पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबत उत्सव हा संपूर्ण जगात फक्त नागपूर शहरातच साजरा केला जातो. या उत्सवाला १४५ वर्षांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. शुक्रवारीही मारबत व बडग्यांची मिरवणुकीची परंपरा शुक्रवारीही कायम राहिली. यंदा मारबत महोत्सवाचा जागर करण्यात आल्याने नागपूरकरांसोबत विदेशी पाहुण्यांसह दिग्दर्शक सुभाष घई व अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही नागपूरच्या काळी, पिवळी माबरतसह लाल, निळी व भुऱ्या मारबत मिरवणुकीचा आनंद लुटला. दिग्दर्शक सुभाष घई यांनी यावेळी नागपूरशी त्यांचे नाते स्पष्ट केले.

सुभाष घई म्हणाले, खूप कमी लोकांना माहित आहे…

मारबत महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमाने सुभाष घई यांना गाठले. यावेळी सुभाष घई यांनी त्यांच्या नागपूरशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नातेबाबत सांगिलते. ते म्हणाले, खूप कमी लोकांना माहिती आहे की माझा जन्म नागपूरचा आहे. त्यामुळे नागपूरशी विशेष जिव्हाळा आहे. हा मारबत महोत्सव १४५ वर्षांपासून होत आहे. मारबतबाबतही मला माहिती आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा आला फोन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन मारबत महोत्सवासाठी फोन आला. मी त्यांना नक्कीच येणार म्हणून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जॅकी श्रॉफ यांनाही घेऊन यायला सांगितले. मी जॅकी श्रॉफ यांना विनंती केली, तेही या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आनंदाने सोबत आले. लाखो लोकांना एकत्र बघून खूप आनंद झाल्याचे सुभाष घई म्हणाले.

जॅकी श्रॉफ म्हणाले, घेऊन जा गे मारबत

इतवारी, महाल, चिटणीस पार्कच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी, पिवळ्या, भगव्या, गुलाबी रंगाच्या गुलालाची उधळण, डीजेसह ढोल, ताशा, संदल बँडच्या तालावर थिरकत महागाई, नीट, एमपीएससी पेपरफुटीतील आरोपी, पाकच्या फिल्ड मार्शलला घेऊन जा गे मारबतच्या घोषणांना साद देत मारबत व बडग्या उत्सव नागपूरकरांनी अनुभवला. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ यांनीही नागपूरकरांसोबत ‘ईडा पिडा घेऊन जा गे मारबत’ची घोषणा दिली. गांधी चौक परिसरात त्यांना बघण्यासाठी गर्दी केलेल्या नागपूरकरांनीही त्यांना प्रतिसाद दिला.

विविध देशातील वाणिज्य राजदूतांची हजेरी

नागपुरातील मारबत महोत्सवात प्रथमच अभिनेत्यांसह विविध देशातील वाणिज्य राजदूतांनी हजेरी लावली. फ्रांसचे वाणिज्यदूत पॅट्रीक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्य दूत मोनिका निगलगार्ड, फिनलँडच्या वाणिज्यदूत पेट्रा थीमन, क्रिकेटपटू उमेश यादव, मराठीतील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरीनेही मारबत व बडग्याची मिरवणूक बघितली. मुख्यमंत्री, महापौर यांच्यासह फ्रांस, नॉर्वे, व फिनलँड देशाचे वाणिज्य राजदूतांनी पिवळी मारबतच्या मिरवणुकीवर पुष्पवर्षांव केला.