नागपूर : जमीनीच्या पृष्ठभागाखाली अधिवास असणार्‍या वाम माशाच्या कुळाचा आणि एका नव्या प्रजातीचा शोध भारतातील संशोधकांनी लावला आहे. उत्तर भारतातील सिंधू-गंगेच्या मैदानी प्रदेशामधून नविन कूळ आणि प्रजाती शोधण्यात आली. या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, आणि ईशान अगरवाल, तसेच चायनिज अकॉडमी आॅफ सायन्सचे यू हे आणि झूलॉजीकल सर्व्हे आॅफ इंडीयाचे अनिल मोहोपात्रा यांचा सहभाग आहे.

हा मासा सर्वच अंगाने वेगळा

नव्याने शोधलेल्या माशाची लांबी साधारणतः चार सेंटीमीटर आहे. त्वचेखाली झाकलेले अविकसीत डोळे, रंगहीन शरीर, आणि अविकसीत बरगड्या ही सर्व वैशिष्ट्ये या माशांना जमीनीखाली वावरण्यास मदत करतात. सिंधू-गंगेच्या मैदानी प्रदेशामधील आढळावरुन गंगा या गंगा नदीचे संस्कृत नावावरुन आणि ईक्तीयस या मांशांसाठीच्या ग्रीक शब्दाच्या जोडणीतून ‘गंगायईक्तिस’ असे नाव या कूळाला देण्यात आले आहे. त्याचबरोबर या कूळातील प्रजाती ही बिहारच्या नेपाळकडील बाजूच्या सीमाभागातून शोधण्यात आलेली आहे. प्रजातीच्या या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘इंडोनेपालीकस’ असे करण्यात आले आहे.

टिकटॉक व्हिडीओ ठरला कारण

या संशोधनाची सुरुवात झाली एका टिक टॉक व्हिडीओमुळे. एक विलक्षण मासा पाण्याच्या हातपंपामधून बाहेर आल्याचा तो व्हिडीओ. हातपंपाच्या पाण्याबरोबर जमीनीखालून बाहेर येणे, रंगहीन असणे, आणि विलक्षण शरीरठेवण यांमुळे त्याकडे संशोधकांचे लक्ष वेधले गेले. जुणे संशोधन निबंध चाळले असता सिंधू-गंगेच्या मैदानी प्रदेशामधून अशा प्रकारची कोणतीही माशाची प्रजाती ज्ञात नसल्याचे समोर आले.

संशोधक अक्षय खांडेकर म्हणतात..

“प्रजातीच्या जमीनीखालच्या वास्तव्यामुळे त्यांना शोधून काढणे आव्हानात्मक होते. हातपंप शोधने, परत त्या पंपाच्या मालकाला मासा शोधण्यासाठी पाणी उपसायचे आहे हे पटवून देणे, ही सगळी दिव्ये पार पाडल्यानंतर पाणी उपसायला सुरुवात व्हायची. या सगळ्यात हाताने पाणी उपसने हे सर्वांत आव्हानात्मक होते. पहिला मासा मिळवण्यासाठी साधारणतः दोन हजार लिटर पाणी हाताने पंप करुन उपसावे लागले. दुसरा मासा मिळवण्यासाठी पुन्हा साधारणतः पाचशे लिटर पाणी उपसले गेले. उपसलेले पाणी शेतीसाठी वळवण्यात आले होते.”

संशोधक तेजस ठाकरे म्हणतात..

जमीनीच्या पृष्ठभागाखाली वावरणारी माशाची नवी प्रजाती भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात आढळून आली. ‘इंडोनेपालीकस’ हे तिला दिलेले नाव तिचे आढळक्षेत्र दर्शविते.

संशोधक ईशान अग्रवाल म्हणतात..

गंगायईक्तिस म्हणजे गंगेचा मासा. गंगा ही भारतातील महत्वाची नदी आहे. हिंदू संस्कृतीमधे गंगेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोखो लोकांची उपजीविका तिच्या संसाधनांवर अवलंबून आहे. त्याचबरोबर ‘गंगायईक्तिस इंडोनेपालीकस’ ही गंगा-सिंधू मैदानी प्रदेशातील जमीनीच्या पृष्टभागाखाली राहणार्‍या माशांची ही पहीली नोंद आहे.”