कलावंतांनी नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारल्यानेच ‘बाडरे’ला यश

कुठल्याही चित्रपटाची मूळ संहिता हा खऱ्या अर्थाने त्या चित्रपटाचा प्राण असतो.

अभिनेत्री श्वेता पेंडसे, निर्माते डॉ. निषाद चिमोटे यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : कुठल्याही चित्रपटाची मूळ संहिता हा खऱ्या अर्थाने त्या चित्रपटाचा प्राण असतो. बाडरे या चित्रपटातील मूळ संहितेमध्ये कुठलेही बदल केले नाही आणि प्रत्येक कलावंताने नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारल्यामुळे बाडरे या चित्रपटाला यश मिळाले.  रसिकांच्या आमच्याकडून वाढलेल्या अपेक्षा बघता आता आमचीही जबाबदारी  वाढली आहे, असे मत या चित्रपटातील अभिनेत्री, पटकथा-संवाद लेखिका श्वेता पेंडसे व निर्माते डॉ. निषाद चिमोटे यांनी व्यक्त केले.

बाडरे या मराठी  चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे निर्माते डॉ. निषाद चिमोटे व अभिनेत्री श्वेता पेंडसे यांनी लोकसत्ता कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. या चित्रपटाच्या यशात डॉ. चिमोटे, श्वेता पेंडसे यांच्यासोबत   रोहन गोखले या नागपूरकर संगीतकाराचे मोलाचे योगदान आहे.  प्रत्येक चित्रपटाच्या यशात दिग्दर्शक, कलावंत आणि  पडद्यामागील कलावंतांचा वाटा असला तरी चित्रपटाचा खरा आत्मा हा चित्रपटाची संहिता  असते. या चित्रपटाची संहिता आणि त्यातील पटकथा संवाद लिहिल्यानंतर चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले. परंतु, मूळ संहितेमध्ये काहीही बदल न करता हा चित्रपट तयार करण्यात आला. तो पुरस्कारासाठी  स्क्रीनिंगला पाठवला. परंतु, पुरस्काराची खात्री नव्हती. मात्र  पुरस्काराची  घोषणा झाली आणि जे स्वप्न बघितले होते ते पुरस्कारामुळे साध्य झाल्याचे यावेळी दोघांनीही सांगितले. 

  श्वेता पेंडसे म्हणाल्या, या चित्रपटाची संहिता तयार झाल्यानंतर त्यातील  भूमिकांसाठी  कलावंताची निवड, हे सुद्धा आमच्यासमोर आव्हान होते. मात्र अंजली पाटील, मकरंद देशपांडे, अशोक समर्थ यांच्यासह सर्व कलावंतांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली. निर्मात्याचा खुप पाठिंबा मिळाला. बाडरेच्या कथेविषयी बोलताना निषाद म्हणाला, मृत्यू व पुनर्जन्म या काळाच्या अंतराळात चालत राहणारी वैचारिक भौतिक अनागोंदी अवस्था म्हणजे बाडरे.  करोनाच्या काळात आपण प्रत्येकाने जो अनुभव घेतला आहे त्याचाच सार  बाडरेमध्ये आहे. ‘बारडो’ हा तिबेटीयन शब्द आहे. माणसाचा मृत्यू आणि पुनर्जन्म यामधील अवस्था, असा त्याचा अर्थ असतो. आपल्या स्वप्नांबाबतीत तसेच काहीसे असते. अनेकदा आपण स्वप्न पाहतो; पण ते पूर्ण होत नाहीत. मात्र, जेव्हा  पूर्णत्वास येतात, तेव्हा त्याचा पुनर्जन्म होतो. स्वप्नांची हीच संकल्पना महाराष्ट्रातील मातीतल्या एका कथेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  एकप्रकारे माझ्या आणि संपूर्ण टीमच्या स्वप्नांचा पुनर्जन्म झाला. प्रत्येकाने स्वप्न पाहणे गरजेचे आहे. स्वप्न पाहिली नाहीत, तर ती साकार होणार नाहीत; म्हणून शहर, ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाने स्वप्नांचा पाठलाग करण्याची जिद्द बाळगायला हवी, असेही निषाद म्हणाला.

चित्रपटाची संहिता  निर्मात्यांना आवडणे आवश्यक असते. चित्रपट तयार करण्यासाठी भरपूर पैसा लागतो आणि मराठी चित्रपटासाठी निर्माता मिळविणे  कठीण असत. मात्र निषादसह अन्य निर्माते आम्हाला  मिळाले. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला.  चित्रपटाला रोहन गोखले यांनी छान संगीत दिले आहे.  डिसेंबपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल, या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना हा चित्रपट आवडेल, असा विश्वास आहे. विदर्भातील वऱ्हाडी बोली भाषेचा या चित्रपटात उपयोग करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुरस्कार मिळवून देणारा गाव पुरामुळे उद्ध्वस्त

या चित्रपटासाठी पुण्यात आणि पुण्यापासून २८ किमी दूर तानाजी मालसुरे यांच्या गावात सेट उभारण्यात आला होता. या ठिकाणी चित्रिकरण करताना वेगळाच आनंद होता. निसर्गरम्य असे वातावरण होते. परंतु, अतिवृष्टी येऊन गावात पूर आला आणि सगळा सेट उद्ध्वस्त झाला.  ज्या गावाने हा पुरस्कार मिळवून दिला ते गाव पुरामुळे उद्ध्वस्त झाल्याचे फारच वाईट वाटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Success badre different roles played ysh

ताज्या बातम्या