जिद्द, चिकाटी आणि मेहनत, यवतमाळचा ‘सुमित’ झळकला यूपीएससीत, तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस | Loksatta

जिद्द, चिकाटी आणि मेहनत, यवतमाळचा ‘सुमित’ झळकला यूपीएससीत, तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सोमवारी (३० मे) जाहीर झालेल्या निकालात वणी तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ३५६ वी रँक मिळविली.

जिद्द, चिकाटी आणि मेहनत, यवतमाळचा ‘सुमित’ झळकला यूपीएससीत, तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस
शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके

यवतमाळ – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) सोमवारी (३० मे) जाहीर झालेल्या निकालात वणी तालुक्यातील शिरपूर येथील सुमित सुधाकर रामटेके याने ३५६ वी रँक मिळविली. त्याने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. त्याच्या या प्रयत्नाने वणीसारख्या ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली आहे.

घरची परिस्थिती हालाखीची असतानाही सुमितने यशोशिखरावर पोहचण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. सुमितचे वडील शिरपूर येथील गुरुदेव विद्यालयात परिचारक होते. सुमितने शिरपूर येथील जिल्हा परिषद शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. पुढील शिक्षण वणी येथील जनता विद्यालात पूर्ण केले. बारावीनंतर आयआयआयटी वाराणसी येथून बी.टेक केले. त्याला उत्तम वेतनाची नोकरीसुद्धा मिळाली होती. मात्र, प्रशासकीय सेवेत जायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.

शिरपूर सारख्या लहानशा गावातून येऊनही जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तिसऱ्या प्रयत्नात त्याने आयपीएस रँक मिळवली. सुमितने यापूर्वी दोन वेळा लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आहे. दुसऱ्यांदा त्याने अनुसूचित जाती या प्रवर्गातून ७४८ वी रँक प्राप्त केली होती. दिल्लीत ‘डायरेक्टर इन इंडियन कॉर्पोरेट लॉ’ येथे तो रुजू झाला होता. मात्र, त्याने पुन्हा जोमाने परीक्षेची तयारी केली आणि तिसऱ्या प्रयत्नात आयपीएस होत यश प्राप्त केले.

हेही वाचा : आयआयएममधील एमबीएनंतरही आस प्रशासकीय सेवेची, मुंबईकर प्रियंवदा म्हाडदळकर यूपीएससीत देशात तेरावी

हा प्रवास स्वप्नवत असला तरी सुमितच्या यशामागे कुटुंबियांचे प्रोत्साहन, त्याची स्वतःची इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमच कारणीभूत असल्याची भावना निकालानंतर रामटेके परिवाराने व्यक्त केली. सुमितच्या यशात आई ज्योत्स्ना व वडील सुधाकर रामटेके यांचे योगदान महत्वाचे ठरले. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ‘सुमित’ आदर्श ठरला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2022 at 18:15 IST
Next Story
UPSC CSE Final Result 2021 : ‘युपीएससी’ परीक्षेत उपराजधानीतील विद्यार्थ्यांचा झेंडा, तीन उमेदवारांनी मारली बाजी