महेश बोकडे

नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर दोन आठवडे करोनावरील जनुकीय चाचणी झाली. त्यानुसार नागपूर एम्स आणि पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत (एनआयव्ही) एकाच वेळी २० नमुने तपासले असता दोन्ही प्रयोगशाळेचे अहवाल सारखे आले. हे यश बघता एम्सने प्रथमच सोमवारी नव्याने १९ नमुने तपासणीला घेतले.

मध्य भारतात सध्या केवळ नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील (नीरी) प्रयोगशाळेतच जनुकीय चाचणीची सोय आहे. या प्रयोगशाळेवर विदर्भातील अकरा जिल्ह्यांसह जम्मू काश्मीर, तामिळनाडू या राज्यांतीलही नमुने तपासणीचाही भार आहे.  राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेत  नागपूर एम्सलाही जनुकीय चाचणी प्रयोगशाळा स्थापित करण्याचे निश्चित झाले. परंतु, केंद्र सरकारने निश्चित केलेल्या मेक इन इंडियाच्या निकषांमुळे  हा प्रकल्प रखडला.

दरम्यान, अमेरिकेतील पॅथ या संस्थेने देणगीद्वारे यंत्र दिले. परंतु, त्यानंतरही रसायन आणि तपासणी संच उपलब्ध न झाल्याने चाचणी लवकर सुरू झाली नाही. आता एम्सला सगळे यंत्र व साहित्य मिळाल्याने प्रायोगिक चाचणी सुरू झाली. त्यानुसार एम्सच्या आणि पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत एकाचवेळी एकाच रुग्णाचे नमुने तपासले गेले. दोन्ही प्रयोगशाळेतील नमुन्यांचे अहवाल सारखेच आल्याने चाचणी यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. या यशानंतर सोमवारी एम्सने १९ नमुने जनुकीय चाचणीसाठी घेतले. त्याचा अहवाल तीन ते चार दिवसांत स्पष्ट होणार आहे. या वृत्ताला एम्सच्या एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.

रसायन मोफत मिळणार 

एम्सला पहिली दोन वर्षे अमेरिकेतील पॅथ आणि जपायगो एड्स या संस्थेकडून जनुकीय चाचणीसाठी लागणारे काही रसायन आणि इतर रसायन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून मिळणार आहे. त्यामुळे या रसायनांचा आर्थिक भार एम्सवर पडणार नाही.