विदर्भ गौरव पुरस्कार समारंभात वक्त्यांचा सूर; धीरज जुनघरे यांना पुरस्कार प्रदान

नागपूर : विदर्भातील शेतकरी चिंतित आहे. या शेतकऱ्याला प्रगतिशील शेतकऱ्यांच्या यशस्वी गाथा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची माहिती देण्यासाठी यशस्वी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला. कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने माणिकलाल गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा विदर्भ गौरव पुरस्कार आधुनिक तंत्राद्वारे शेती करणारे धीरज जुनघरे यांना देण्यात आला. जुनघरे मागील ४० वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत असून संत्रा उत्पादनात अग्रेसर आहेत.

श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, राष्ट्रभाषा संकुल, शंकरनगर चौक येथे बुधवारी आयोजित सोहळ्यात काटोल कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष चरणसिंह ठाकूर यांच्या हस्ते व वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त अनंत घारड प्रमुख अतिथी होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्रीराम काळे, किशोर कन्हेरे उपस्थित होते. विदर्भाच्या विकासासाठी भरीव कार्य करणाऱ्या किंवा विदर्भाचा लौकिक राज्यपातळीवर, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढवणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येते. यंदाचा विदर्भ गौरव पुरस्कार-२०२१ चा हा पुरस्कार  जुनघरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जुनघरे यांची पत्नी आणि मुलगा उपस्थित होता.  शेतकऱ्यांनी शेतीमालावर प्रक्रिया आणि शेतमालाचे विपणन शिकून घेतल्यास चित्र बदलले. जुनघरे यांनी काटोल तालुक्यात ग्रिन व्हॅली हा २२० एकरात प्रकल्प टाकून तो यशस्वी केला. ते विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक आहे, असे अग्निहोत्री म्हणाले. घारड यांनी आपला शेती करण्याचा अनुभव कथन केला आणि संत्र्यांची गुणवत्ता अजून वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. चरणसिंह ठाकूर यांनी शेतकऱ्यांना  संत्र्याची चांगली कलमे मिळावी आणि मातीचे परीक्षण  करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.  गिरीश गांधी यांनी पुरस्कार विजेते शेतकरी जुनघरे यांचा परिचय करून देताना जुनघरे यांच्या सारख्या धाडसी, प्रगतिशील शेतकऱ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळते, असे गौरवोद्गार काढले.