अजेय गंपावार
“चांदी का परदा, सोने का प्रोजेक्टर, नाईट्रेट की फिल्म, जिसमे अब आग नहीं लगती, पर आँखे गरम, जिगर ठंडा अभी लगता है, एक परदा उधर है, एक परदा इधर, और दोनो के बिच कहानियाँ, हसीं, गुस्सा, दर्द, मौन, पॉपकॉर्न, हार्ट ब्रेक, सिंगल टेक, दिलोजान, रे, फरहादी, नोलान, केन लोच, त्रुफो, हर्जोग… सिनेमा तो है ही… और क्या चाहिए !” ही वरुण ग्रोवरची कविता ऐकताना मन थरारून जाते. डोळ्यांचा पडदा आणि थिएटरमधला पडदा यांच्यादरम्यान घडणाऱ्या असंख्य कथा.
आईच्या गर्भात आहे असे वाटणारा तो उबदार अंधार आणि अद्भुत प्रातांत घेऊन जाणारे ते जादुई क्षण. खुल जा सीम सीम म्हणत गुफा उघडावी आणि आतल्या ऐश्वर्याने आपले डोळे दिपून जावे. आमच्यासारख्यांसाठी ही गुफा म्हणजे धरमपेठमधली सुदामा टॉकिज. सुदामाने कधीकाळी अनेकांचे भणंग आयुष्य गुलजार केले होते. फेब्रुवारी उजाडला की कॉफी हाऊस ते लक्ष्मीभूवन चौक या रस्त्याला बहर यायचा. अनेक तरुण ‘व्हॅलेंटाईन डे’ची वाट बघत गुलाबाची फुले, चॉकलेट्स आणि आर्चिजचे ग्रिटींग्ज कार्ड घेऊन मैत्रिणीकडे आपल्या प्रेमाचा इजहार करीत. मोठमोठ्या बाईक्स स्टँडवर लावून बाजूला उभ्या असलेल्या या तरुणांकडे सर्वसामान्य लोक मात्र विस्फारलेल्या नजरेने बघत.
सामान्य, अतिसामान्य, गमछा घातलेले मजूर, रिक्षावाले यांचे जग खूप वेगळे होते. यांची ऑलटाईम मेहबुबा होती सुदामा टॉकिज. बाहेर रणरणते ऊन असू दे की मुसळधार पाऊस. खिशाला परवडणारे पाच-दहा रुपयांचे तिकीट काढले की आतली सुंदर ती दुसरी दुनिया तुम्हाला आयुष्यातले सर्व दुःख विसरायला लावत असे. मागच्या पन्नास वर्षात सुदामा टॉकिजने दोनचार पिढ्यांना तरी पोसले… नव्हे जगवले असेल. सुदामाची ती देखणी आणि डौलदार इमारत अजूनही अनेकांच्या डोळ्यात तरळते.
दर्शनी भागातली निमुळती चिरेबंदी भिंत आणि त्यावर लटकलेले टोलेजंग होर्डिंग म्हणजे पहिली झलक. नंतर सुरू होत असे अडीच-तीन तासांचा विलक्षण प्रवास, जणू काही सिंदबादची साहसी सफरच. खाली बॉक्स ऑफिसमध्ये तिकीट घेतले की निमुळत्या गल्लीतून गर्दीच्या रेट्यात पुढे पुढे जायचे. बाजूच्या भिंतीवरती काचेच्या लाकडी शोकेसमध्ये लावलेले आगामी सिनेमांचे पोस्टर्स पाहायचे. गेटकिपरने तिकीट फाडले की चांगल्या मधल्या जागेतल्या खुर्च्या पकडण्यासाठी धावपळ करायची. गर्दी असेल तर मग एकजण इकडे, एकजण तिकडे अशी, बचपन मे बिछडे भाईंयो सारखी ताटातूट व्हायची. बाल्कनीत बसणाऱ्यांचा रूबाब राहायचा. त्यांच्या खुर्च्यांना क्रमांक असल्यामुळे ते लोक टेचात जिना चढून जग जिंकल्याच्या आवेशात वर जायचे.
एकदा का स्थानापन्न झालो की मग न्युजरिल्स, भारतीय समाचार, एखाद्या येणाऱ्या सिनेमाचे धडाकेबाज ट्रेलर आणि नंतर मग दिव्य अनुभूती. हा सारा एक सामूहिक उत्सवच होता. एकत्र हसणे, एकत्र रडणे, शिट्ट्या, टाळ्या, हुर्यो… वैयक्तिक काहीच राहात नसे. थिएटरच्या गडद अंधारात आजूबाजूचे अपरिचित नातेवाईक भासत. जात, धर्म, लिंग, वय, आर्थिक परिस्थिती सारे विरघळून जात आणि सगळे एका समान पातळीवर येऊन पडद्यावरच्या आनंदाला सामोरे जात. हिट गाणे सुरू झाले की चिल्लर नाण्यांच्या खणखणाट सिनेमाला जिवंत रसरशीत अनुभवात बदलून टाकत असे. सुपरहिट सिनेमाला गर्दी असली की खुर्च्या न मिळालेले शौकीन प्रेक्षक पडद्यासमोरच्या कट्ट्यावर झोपून सिनेमे बघत. थर्ड क्लासचे तिकीट काढून सिनेमे बघणारे ते ‘फर्स्ट क्लास’ प्रेक्षक असत. मध्यंतर झाला की थिएटर समोरच्या हातगाड्यांवर थंड पाणी आणि खिसा झुळझुळत असेल तर गरम गरम टपोरे समोसे ही मौज वेगळीच असे.
रविवारी सुदामामध्ये सिनेमा, बाजूच्या गायत्री मेसमध्ये जेवण, लालाजीच्या संगममध्ये कॉफी आणि दुबेजींच्या पानठेल्यावर मसाला पान अशी पाच पन्नास रुपयांमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबाची चंगळ होत असे. ब्लॅकचे तिकीट विकत घेणे, कॉलेजला, ऑफिसला दांडी मारून फर्स्ट डे फर्स्ट शो बघणे ही त्या महाकाव्यातली रमणीय प्रकरणे! राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चनचा ‘आनंद’ चित्रपट हा सुदामात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा. तो शंभर दिवस तुफान चालला. पुढचे पन्नास वर्षे सुदाम टॉकिजने नागपूरकरांच्या दोन-तीन पिढ्यांना फक्त आनंद आणि आनंदच दिला. स्पिलबर्गचा इनरस्पेस असू दे की, जेम्स बाँडचा आक्टोपसी. ॲम्बुलन्स घेऊन फिरणारा आणि देमार फायटिंग करणारा त्रिशुलमधला अमिताभ, हा सारा माहोल अवर्णनीयच होता.
रामसे बंधूंचे हॉरर सिनेमे, बासू चटर्जी-सई परांजपेंचा निखळ विनोद, दादा कोंडकेंचा डबल डोस, निहलानींचा अर्धसत्य, आणि सिनेमाची भाषा बदलवून टाकणारा ‘दिल चाहता है’ असे अनेक पिढ्यांचे संदर्भ सुदामासोबत जुळले आहेत. सुदामा टॉकिज म्हणजे माझ्या पिढीतल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला मंतरलेला काळ. कुणासाठी त्या काळाचे नाव रिजंट, रिगल, स्मृती किंवा नटराजही असू शकते. या फक्त इमारती नव्हत्या. सामान्य लोकांच्या आयुष्यातले ते भावबंध होते. अनेकांचे हळवे धागे येथे जुळलेले होते. खांद्याला खांदा भिडवून सुदामाच्या ऊबदार अंधारात बघितलेल्या सिनेमाची अनुभूती आता ‘ऑन डिमांड ’ सिनेमे किंवा ‘नॉइज कँसलिंग’ हेडफोन लावून बघितलेल्या सिनेमात मिळू शकत नाही. स्थळ, काळ या सीमा ओलांडून सिनेमा आता खिशात आला, बोटाच्या टोकावर आला.
सिनेमा बघणे आता वैयक्तिक झाले. सामूहिक पातळीवर तो आनंद दुरापास्त झाला. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन सिनेमा बघणे ही पैसेवाल्यांची मक्तेदारी झाली. तो चकचकीत झाला, त्यात प्रतिष्ठा आली. थिएटरमधल्या सिनेमाला आता घामाचा सुगंध येईनासा झाला. उंची परफ्युम्सनी तो दरवळत राहतो. होस्टेलमध्ये राहत असताना रात्रीचा शो बघून बारा एक वाजता मित्रांसोबत रविनगर चौकापर्यंत पायदळ जाणे आणि नुकत्याच पाहिलेल्या सिनेमावर गप्पा मारणे हे त्यावेळचे केवढे मोठे सुख होते. शिक्षण झाल्यावर आयुष्याचे बस्तान बसण्यापूर्वीचे ‘कटी पतंग’ सारखे ते दिवस इथल्याच अंधारात सुसह्य झाले होते. फ्रस्ट्रेशन, दुःख, बकालपणा, एकटेपणा किती मनाच्या अवस्था होत्या तेव्हा… तेव्हा ही टॉकिज केवळ मलाच नव्हे तर माझ्यासारख्या कित्येकांना आपल्या बाहुपाशात घेत होती आणि सारे व्याप-ताप अंधारात विरघळून जात होते. थर्डक्लासचे तिकीट काढून सिनेमे बघणे आणि ट्रांजिस्टरवर गाणे ऐकणे हाच काय तो त्याकाळात विसावा होता.
आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणावर या टॉकिजने अनेकांना आधार दिला. कित्यकदा मी या टॉकिजसमारे उभा राहून दुपारचा चहा पित असे. कधी उशिरा टॉकिजच्या पायऱ्यांवर निवांत बसत असे. एक ओळखीची ऊब आजूबाजूच्या वातावरणात जाणवत असे. हिट सिनेमा लागला की कुटुंबवत्सल कर्त्या बाईसारखी हिची ओटी गजबजून जात असे. सिनेमा फ्लॉप असेल तर, संध्याकाळी कुणाची तरी वाट बघत असलेल्या म्हातारीसारखी ती विषण्ण भासत असे. आता ती पाडल्या गेली. कितीतरी जोडप्यांचा अंधारात फुललेला नवथर प्रणय माती-विटांखाली दबून गेला. शिट्ट्या, टाळ्या, गर्दी, मारामारी, ब्लॅकची तिकिटे इतिहासजमा झाले आणि सोबतच माझ्यासारख्या अनेकांच्या आठवणींनाही मूठमाती मिळाली. कॉफी हाऊस गेले तेव्हाही एक कळ दाटून आली होती. आता सुदामा टाकिजही गेली. शहरातली आपली वाटणारी ओळखीची ठिकाणे हळूहळू नाहीशी होत चालली आहेत. ‘इस दिल में बस कर देखा तो, यह शहर बड़ा पुराना है, हर सांस में कहानी है, हर सांस में अफसाना है…’ असे म्हणताना काहीतरी इथे नवीन निर्माण होत आहे. त्याजागी आपल्याऐवजी दुसरे कुणीतरी येतील. त्या नव्या निर्माणासोबत त्या नव्या माणसांच्या नव्या टवटवीत आठवणीसुद्धा असतील.
अजेय गंपावार
gampawar_ajey@yahoo.com
