Maharashtra mlc election result 2023 नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी समर्थित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे विजयी उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पक्षभेद न मानता सर्व शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार, अशी प्रतिक्रिया विजयानंतर दिली.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत अडबाले यांनी भाजपाचे विद्यमान आमदार नागोराव गाणार यांचा दणदणीत पराभव केला. पहिल्या फेरीतच त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करणे सुरू केले आहे. निवडणूक निकालाबाबत बोलताना अडबाले म्हणाले, दोन वर्षापासून मी मतदारसंघातील शिक्षकांच्या संपर्कात होतो. जुन्या पेन्शन योजनेसाठी मोर्चेही काढले.
महाविकास आघाडीने पाठींबा दिल्याने विजयी होईल, अशी अपेक्षा होतीच. आता पुढच्या काळात मी राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. नागपूरच्या जागेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गृहजिल्ह्यात ही निवडणूक असल्याने या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अडबाले यांच्या विजयाने काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला.