अमरावती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि दर्यापूर येथील काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. आमदार बच्चू कडू यांनी पश्चिम विदर्भात शिवसेना पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्याला गळाला लावल्यानंतर बच्चू कडू यांनी आता थेट काँग्रेसवर प्रहार केला आहे.

सुधाकर भारसाकळे होते नाराज

सुधाकर भारसाकळे हे सहकार क्षेत्रातील प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपुर्वीच भारसाकळे यांनी काँग्रेस दर्यापूर तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, ज्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर दर्यापूर येथे आयोजित समर्थकांच्या या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. या मेळाव्याला मोठ्या संख्येने समर्थक, कार्यकर्ते आणि विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझी वारंवार कोंडी करण्यात आली आणि मला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करण्यासाठी आपण शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सुधाकर भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री संजय राठोड आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यात दर्यापूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप चव्हाण, दर्यापूर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे, दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजू उर्फ श्रीकृष्ण कराळे, संचालक गजानन देवतळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर, राजेश राठी, अनिल भारसाकळे, मधुसूदन पाचे, संजय चांदूरकर, कैलास घडते, अमोल धर्माळे, भैय्यासाहेब टेकाडे, संतोष भोंडे आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडेंना धक्का

सुधाकर भारसाकळे यांचा शिवसेना प्रवेश हा काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. दर्यापूर हे वानखडे यांचे गृहक्षेत्र आहे. आपल्या गावातच काँग्रेसची पडझड त्यांना रोखता आली नाही. भारसाकळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देताना निर्णय प्रक्रियेत आपल्याला स्थान देण्यात आले नाही, असा आरोप केला होता.