लोकसत्ता टीम

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गेल्या काही दिवसांपासून सहानुभुती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेत्यांना व कुटुंबियांना ईडी किंवा अन्य संस्थाकडून नोटीस दिली तर देशात लोकशाही संपली, असा आरोप त्या करतात मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर यांना नोटीस देण्यात आली होती. नारायण राणे यांना अटक केली. तेव्हा कुठे केली होती लोकशाही, असा टोला राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पक्षाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्या संस्थांना काम करु द्यायचे नाही, असे सध्या चालले आहे. राजकीय नेता म्हणून विशेष कवच आहे, असा भाव आणायचा आणि सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा, असे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांचे चालले आहे, अशी टीका त्यांनी केली. अजित पवार महाविकास आघाडीत असते तर मुख्यमंत्री झाले असते, असे आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगत आहे. तेव्हाच सांगितले असते तर काही फायदा झाला असता. आता हा त्यांचा नवा डाव आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.

आणखी वाचा-चंद्रपूर : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार मित्रांचा मृत्यू

भारतीय जनता पक्षासह महायुतीमधील तीनही पक्षाचे सर्वे सुरू असून प्रत्येकजण आपल्या परीने ते करत असतो. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सर्वे फक्त जागा वाटपाबाबत नसतात. राज्य सरकारच्या योजनांबाबत लोकांचे काय मत आहे? हे जाणून घेतले जाते. सर्वेमध्ये जर ज्या ज्या नेत्यांबाबत नकारात्मक अहवाल असेल, तर त्या ठिकाणी उमेदवारी देताना गंभीरपणे विचार केला जातो. असे असले तरी अहवाल हा उमेदवारी न देण्याचा आधार नाही. लोकांची मते जाणून घेतली जातात,असेही मुनगंटीवार म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात नाही. निवडणूकीत चांगल्या उमेदवाराला संघ मदत करतो. देश हितासाठी संघ काम करतो, असेही मुनगंटीवार म्हणाले. ॲाक्टोबरमध्येच विधानसभा निवडणूका जाहीर होतील. तीन राज्याच्या निवडणूका तीन महिन्यात येतात. हरियाणाचे सरकार पाच नोव्होंबरपर्यंत स्थापन करायचे आहे. महाराष्ट्राचे २६ नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झारखंडचे सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ॲाक्टोबरमध्ये निवडणूका होऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी भांडण आहे. राज्याच्या हितासाठी ,असे होत असेल तर स्वागत करा अशी टीका त्यांनी केली.