नागपूर : मानव-वन्यजीव संघर्षाच्या प्रश्नावरून भाजप आमदार तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर निधी न देता त्यांना मंत्रालातील अधिकारी ताटकाळत ठेवतात. अशा अधिकाऱ्यांना एक दिवसाचा कायदा करून झाडाला बांधा आणि वाघ सोडा, म्हणजे त्यांना या संघर्षातील पीडितांची व्यथा कळेल.
आदित्य ठाकरेंना काय म्हणाले मुनगंटीवार?
वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर निधी न देता त्यांना ताटकाळत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधतांना त्यांनी आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आदित्यजी या अधिकाऱ्यांना सरळ करण्यासाठी आम्हाला तुमच्याच नेत्यांची भाषा वापरावी लागते. संजय राऊत यांच्या शब्दकोषातील भाषा ऐकवल्याशिवाय हे अधिकारी ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना वठणीवर आणायचे असेल तर राऊतांच्या शब्दकोषातील भाषा वापरण्याशिवाय आम्हाला पर्याय नसतो.
सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर का संतापले?
वाघाच्या हल्ल्यातील पीडितांना वेळेवर मदत न देता फाईल रखडवणाऱ्या अधिकाऱ्यांवर माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रचंड संतापले. जोपर्यंत असा कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना झाडाला बांधत नाही, तोपर्यंत त्यांना परिस्थितीचे गांभीर्य कळणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला. राज्यातला मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे, पण मुंबईत मंत्रालयात फाईल्स घेऊन बसणाऱ्या अधिकाऱ्यांना याचे गांभीर्य जाणवत नाही. वाघाच्या हल्ल्यातील पिडीतांना वेळेवर निधी न देता हे अधिकारी मुंबईत मंत्रालयात बसून फाईल्स घेऊन बसतात.
मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
वन्यप्राण्यांच्या बचावासाठी कार्यरत असलेल्या प्राथमिक प्रतिसाद पथकांना (रॅपिड रिस्पॉन्स टीम) वर्षानुवर्षे निधी दिला जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना संघर्षग्रस्त भागांमध्ये काम करणाऱ्या पथकांना आवश्यक निधी दिला जात नाही. मनुष्यबळ अपुरे आहेच, पण तेही पुरवले जात नाही. साधनसामग्री वेळेत उपलब्ध करुन दिली जात नाही. वर्षवर्ष त्यांचे वेतन दिले जात नाही. मग हा संघर्ष थांबणार तरी कसा, असा प्रश्न मुनगंटीवारांनी उपस्थित केला.
मुंबईत मंत्रालयात बसून इतर जिल्ह्यातील दु:ख या अधिकाऱ्यांना समजत नसेल तर त्यांनी एकदा चंद्रपूर, गडचिरोलीसारख्या मानव-वन्यजीव संघर्षग्रस्त जिल्ह्यांकडे पाहावे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये वाघ, बिबट आणि अस्वलांच्या हालचालींमुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. एक दिवसाचा कायदा करा आणि मंत्रालयातील फाईलवर बसून राहणाऱ्या अधिकाऱ्यांना एक दिवस झाडाला बांधा आणि समोर वाघ सोडा. म्हणजे इतरांच्या जीवावर काय बेतते, हे त्यांना कळेल, असे वक्तव्य त्यांनी सभागृहात केले.
