नागपूर : देशातील निम्म्याहून अधिक आत्महत्यांसाठी कौटुंबिक समस्या आणि आजारपण हे दोन प्रमुख कारण असल्याची माहिती सुसाईड इन इंडिया अहवालातून समोर आली. वेगाने बदलत जाणारी आधुनिक जीवनशैली तसेच बदलणारी कौटुंबिक संरचना यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्यावतीने अलीकडेच सुसाईड इन इंडिया-२०२४ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यात देशभरातील आत्महत्यांची आकडेवारी तसेच त्यामागील कारणांची माहिती दिली.

आकडेवारी काय सांगते?

अहवालानुसार, देशातील एकूण आत्महत्यांपैकी ५७ हजार १७५ म्हणजेच ३३.५ टक्के आत्महत्यांसाठी कौटुंबिक समस्या कारण पुढे आले आहे. यातील दोन तृतीयांश आत्महत्या या १८ ते ४५ या वयोगटातील आहेत. आत्महत्येचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे आजारपण. देशात ३० हजार ६१७ म्हणजेच १७.९ टक्के लोकांनी आजारपणामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. यातही ९० टक्क्याहून अधिक म्हणजेच सुमारे २८ हजार आत्महत्यांसाठी मानसिक आजारपण (१४ हजार ३०५) आणि दीर्घ आजारपण (१४ हजार ७५) कारणीभूत आहेत.

इतर कारणे काय?

कौटुंबिक समस्या आणि आजारपण याव्यतिरिक्त व्यसनामुळे १२ हजार ९७७ (७.६ टक्के), विवाह संबंधित समस्यांमुळे ८ हजार ५२४ (५ टक्के), प्रेमसंबंधांमुळे ७ हजार ९०५ (४.६ टक्के) लोकांनी आत्महत्या केली. परीक्षेत अपयश, बेरोजगारी, करिअर संबंधित समस्या, नातलगांचा मृत्यू यामुळेही काही प्रमाणात आत्महत्या झाल्या असल्याची नोंद अहवालात करण्यात आली. उत्पन्ननिहाय आकडेवारी बघितली तर एक लाखाहून कमी उत्पन्न असलेल्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण ६२.९ टक्के तर एक ते पाच लाख रुपये उत्पन्न गटात ३१.६ टक्के लोकांनी आत्महत्या केल्या.

एकत्रित कुटुंब पद्धतीचा लोप

एकत्रित कुुटुंब पद्धतीत राहण्याचा प्रकार कमी होत आहे. यामुळे कौटुंबिक समस्या हाताळणे अधिक कठीण होते. तसेच यामुळे नैराश्य किंवा इतर मानसिक त्रासही वाढतात. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक समस्या, मानसिक आजारपण आत्महत्यांसाठी प्रमुख कारण ठरत आहे, अशी प्रतिक्रिया मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आकांक्षा श्रीपतवार यांनी दिली.

कट्टर विचारधारेमुळे १०८ लोकांची आत्महत्या

अहवालातील आश्चर्यजनक तसेच चिंताजनक बाब म्हणजे कट्टर विचारधारेमुळे १०८ लोकांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. यात ६७ पुरुष तर ४१ महिलांचा समावेश आहे. १८ ते ३० वयोगटात हे प्रमाण अधिक आहे. २०२४ मध्ये ११६ कुटुंबानी सामूहिक आत्महत्या केली, ज्यात २७० लोकांनी प्राण गमावले. दुसरीकडे, आत्महत्या करण्यासाठी गळफास लावणे तसेच विष प्राशन करणे या माध्यमांचा सर्वाधिक वापर झाला. ९० टक्क्याहून अधिक आत्महत्या या मार्गाने करण्यात आल्या.