लोकसत्ता टीम यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यालगत सुन्ना येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी, नापिकी व वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त होऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उजेडात आली. राजू श्रीपाद जिड्डेवार (४६) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजूने शेतातील आपट्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. राजू याची सुन्ना येथे टिपेश्वर अभयारण्याला लागुन सुन्ना गेट जवळच चार एकर शेती आहे. त्याच्या शेतातील पिकांचे प्रत्येक वर्षी अभयारण्यातील वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. याही वर्षी त्याच्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केले होते. शिवाय अतिवृष्टीनेसुध्दा पिकांची नासाडी झाली. कापसाला योग्य भाव नसल्याने त्यातही आर्थिक नुकसान झाल्याने सोसायटीचे ४० ते ४५ हजाराचे कर्ज कसे फेडायचे व यंदा शेती कशी उभी करायची या चिंतेत तो होता. हेही वाचा. “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दरबारी…” नाना पटोले यांची टीका, म्हणाले… आज तो शेतात मशागतीचे काम करीत असतानाच, त्याने अचानकपणे शेतातीलच आपट्याच्या झाडाला गळफास लावुन आपली जिवनयात्रा संपविली. मृतक राजुच्या मागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.